कराची - पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी आपल्या वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असतो. नुकतीच त्याने एका पाकिस्तानी पत्रकाराला मुलाखत दिली. ''पाकिस्तान संघ भारताला इतक्या वेळा हरवायचा, त्यानंतर भारतीय खेळाडू आमच्याकडे येऊन माफी मागायचे'', असे आफ्रिदीने म्हटले.
भारताविरुद्ध 67 एकदिवसीय आणि 8 कसोटी सामने खेळणारा आफ्रिदी म्हणाला, ''टीम इंडियाविरुद्धच्या सामन्याआधी मला नेहमीच संघातून काढून टाकण्यात आले. मी भारताविरुद्ध खेळताना नेहमीच आनंद घेतला आहे. आम्ही त्यांचा अनेकदा पराभव केला आहे. मला आठवते की आम्ही त्यांना इतक्या वेळा हरवायचो की नंतर ते आमच्याकडे (विनोदी स्वरात) माफी मागायचे. भारत आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध मी खूप सामन्यांचा आनंद लुटला आहे. या सामन्यांमध्ये खूप दबाव होता. तो एक चांगला आणि मोठा संघ आहे.''
आफ्रिदीने आपल्या कारकीर्दीत भारताविरुद्ध 3 कसोटी आणि 2 एकदिवसीय शतके ठोकली आहेत. 1999 साली चेन्नईत भारताविरुद्ध 141 धावा करणे, ही माझी आवडती खेळी होती, असे त्याने सांगितले.
40 वर्षीय आफ्रिदीने 2016 मध्ये आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आहे. त्याने 20 वर्षाच्या करिअरमध्ये 27 कसोटी, 398 एकदिवसीय सामने आणि 99 टी-20 सामन्यात प्रतिनिधित्व केले आहे. यात त्याने अनुक्रमे 1716, 8064, 1416 धावा केल्या आहेत. आफ्रिदीने आयपीएलमध्ये 10 सामने खेळले असून त्यात त्याने 81 धावा केल्या आहेत.