कोलकाता - बीसीसीआयचे राष्ट्रीय निवडकर्ता देवांग गांधी यांना गुरुवारी बंगालच्या ड्रेसिंग रूममध्ये अनधिकृत प्रवेशासाठी बाहेर काढण्यात आले. येथील ईडन गार्डन्स मैदानावर बंगाल आणि आंध्र प्रदेश विरुद्ध सुरू असलेल्या रणजी करंडक सामन्याच्या दुसर्या दिवशी गांधी यांना यजमान संघाच्या ड्रेसिंग रूममधून बाहेर काढण्यात आले. गांधी यांना रणजी करंडक सामन्यात बीसीसीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक अधिकारी सौमेन कर्माकर यांनी बाहेर काढले.
हेही वाचा - VIDEO : स्मिथला माघारी धाडण्यासाठी क्षेत्ररक्षकाने घेतला दोन बोटात झेल!
अँटी करप्शन प्रोटोकॉलनुसार सामन्यासाठी निवडलेले खेळाडू आणि संघ समर्थन कर्मचारी फक्त ड्रेसिंग रूममध्ये उपस्थित राहू शकतात. बंगालच्या वरिष्ठ खेळाडूंनी गांधी यांच्या ड्रेसिंग रूममध्ये प्रवेश केल्याबद्दल अँटी करप्शन प्रोटोकॉलवर प्रश्न केला होता. दरम्यान, क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालने (सीएबी) देवांगचा बचाव करत म्हटले आहे की, ते वैद्यकीय मदत घेण्यासाठी ड्रेसिंग रूममध्ये गेले होते.
कॅबचे सचिव अविशेक दालमिया म्हणाले की, लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्याने गांधी यांना अल्पावधीसाठी ड्रेसिंग रूममध्ये प्रवेश दिला होता. कॅबने एका निवेदनात म्हटले आहे की, 'राष्ट्रीय निवडकर्ता देवांग गांधी यांना गुरुवारी सामना खेळला जात नसताना ड्रेसिंग रूममध्ये प्रवेश करायचा होता. सामना रेफरीची परवानगी मिळाल्यानंतरच अल्पावधीसाठी लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्याने गांधी यांना परवानगी दिली.'
सीएबीच्या या निवेदनानंतर खेळाडू मनोज तिवारीच्या अडचणी वाढणार आहेत. तिवारीच्या तक्रारीवरून गांधी यांना बंगालच्या ड्रेसिंग रूममधून लाचलुचपत प्रतिबंधक अधिका-यांनी बाहेर काढले होते. 'आम्हाला अँटी करप्शन प्रोटोकॉल अनुसरण करावा लागेल. राष्ट्रीय निवडकर्ता परवानगीशिवाय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये जाऊ शकत नाही', असे तिवारीने म्हटले होते.