शारजाह - जगातील कोणत्याही खेळपट्टीवर सहज धावा करणारा अफलातून फलंदाज, अशी विराट कोहलीची ख्याती आहे. पण विराटसाठी आयपीएलमध्ये एक गोलंदाज कर्दनकाळ ठरताना पाहायला मिळाला. त्या गोलंदाजाने विराटला तब्बल ७ वेळा बाद केले आहे. अशा कारनामा कोणत्याही गोलंदाजांना अद्याप करता आलेला नाही.
सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज संदीप शर्माने विराट कोहलीला ७ वेळा तंबूत धाडले आहे. याआधी विराटला सर्वाधिक वेळा बाद करण्याचा विक्रम आशिष नेहराच्या नावावर होता. त्याने विराटला ६ वेळा बाद केले आहे. याशिवाय संदीप शर्माने जहीर खानच्या एका विक्रमाशी बरोबरी साधली आहे. जहीरने धोनीला ७ वेळा बाद केले होते.
सामना संपल्यानंतर संदीप शर्मा म्हणाला, मी शक्यतो विकेट टू विकेट गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. यात विविधतेने चेंडू फेकले. शारजाहच्या खेळपट्टीवर चेंडू स्विंग होत होता. कारण खेळपट्टी ओली होती. यात आमची रणणिती यशस्वी ठरली.
माझ्याकडे पहिले षटक फेकण्याची जबाबदारी होती. यातून मला इतर गोलंदाजांना कशी गोलंदाजी करावी हे सांगावे लागणार होते. ही जबाबदारी मी योग्य पद्धतीने हाताळली असल्याचे देखील संदीपने सांगितले.
असा रंगला सामना -
वृद्धिमान साहाच्या सावध आणि जेसन होल्डरच्या आक्रमक खेळीमुळे सनरायझर्स हैदराबादने बंगळुरूचे छोटेखानी आव्हान पेलत विजय नोंदवला. बंगळुरूच्या १२१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादची दमछाक झाली खरी, मात्र त्यांनी हे आव्हान १४.१ षटकातच पूर्ण केले. वॉर्नर, विल्यम्सन हे फलंदाज अयपशी ठरले. तर, मनीष पांडेने २६ धावांचे योगदान दिले. साहाने ४ चौकार आणि १ षटकारासह ३९ तर, होल्डरने १० चेंडूत नाबाद २६ धावा केल्या. या विजयामुळे हैदराबादने गुणतालिकेत सातव्या स्थानावरून थेट चौथ्या स्थानी झेप घेतली आहे.
हेही वाचा - CSK VS KXIP : पंजाबच्या प्ले ऑफच्या स्वप्नावर पाणी फेरू शकते चेन्नई
हेही वाचा - आयपीएल २०२० प्ले ऑफ शर्यत : ४ सामने, ६ संघ जागा तीन, जाणून घ्या गणित...