मुंबई - दिग्गज भारतीय माजी फलंदाज सचिन तेंडुलकरकडे बीएमडब्ल्यू, फेरारी, निसान जीटी-आर यांसारख्या जगातील सर्वोत्तम कार आहेत. त्यांची कारविषयीची आवड जगापासून लपलेली नाही. मात्र, व्यावसायिक क्रिकेटपटू झाल्यानंतर त्याने आपल्या पैशांसह घेतलेली पहिली गाडी अद्याप विसरला नाही.
सचिनने एका कार्यक्रमात या गोष्टीचा उलगडा केला. त्याने ही गाडी परत मिळवण्यासाठी आपली इच्छा बोलून दाखवली आहे. तो म्हणाला, "माझी पहिली गाडी मारुती-८०० होती. दुर्दैवाने ही गाडी आता माझ्याकडे राहिली नाही. जर ती परत माझ्याकडे आली तर मला आवडेल. जे माझे ऐकत आहेत त्यांनी याबद्दल मला संपर्क साधू शकतात." "
सचिन पुढे म्हणाला, "माझ्या घराशेजारी एक मोठा ओपन-ड्राईव्ह-मूव्ही हॉल होता, तिथे लोक गाड्या पार्क करून चित्रपट पाहत असत. त्यावेळी मी माझ्या भावाबरोबर आमच्या बाल्कनीत तासनतास उभे राहून या गाड्या पाहायचो. "
क्रिकेटच्या सर्व प्रकारांत मिळून सचिनच्या खात्यात ३४,३५७ धावा जमा आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये १८,४२६ तर, कसोटीत त्याने १५,९२१ धावा चोपल्या आहेत.