मुंबई - भारतीय संघाचा माजी कर्णधार सचिन तेंडुलकर आणि वेस्ट इंडीजचा माजी कर्णधार ब्रायन लारा पुन्हा एकदा २२ यार्डच्या खेळपट्टीवर आमनेसामने असणार आहेत. 'अनअकॅडमी रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज'च्या माध्यमातून हे दोघे एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. या मालिकेत एकूण ११ सामने खेळले जातील. त्यापैकी दोन सामने वानखेडे स्टेडियमवर, चार पुण्यातील एमसीए स्टेडियमवर, चार सामने डीवाय पाटील स्टेडियम व अंतिम सामना ब्रेबॉर्न स्टेडियमवर होईल.
हेही वाचा - 'नवीन दशक, नवीन आरसीबी आणि नवीन लोगो'
मुंबईच्या वानखेडे मैदानावर ७ मार्च रोजी सचिनच्या इंडिया लेजंड्सचा सामना ब्रायन लाराच्या वेस्ट इंडीज लेजंड्सशी होईल. या मालिकेत पाच देशांमध्ये टी-२० सामने खेळले जातील. भारत, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, वेस्ट इंडीज आणि दक्षिण आफ्रिका येथील माजी खेळाडू यात सामील होत आहेत. भारतरत्न सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, झहीर खान, ब्रायन लारा, शिवनारायण चंद्रपॉल, ब्रेट ली, ब्रॅड हॉज, जॉन्टी रोड्स, हशिम अमला, मुथैया मुरलीधरन, तिलकरत्ने दिलशान, अजंता मेंडिस आणि अनेक दिग्गज या मालिकेत सहभागी होणार आहेत.
पुण्यात भारताचे सामने होणार आहेत. १४ मार्च रोजी दक्षिण आफ्रिका लेजंड्स व २० मार्च रोजी ऑस्ट्रेलिया लेजंड्स यांच्यात सामने असतील. वानखेडे आणि डीवाय पाटील पाटील स्टेडियमवर इंडिया लेजेंडचा प्रत्येकी एक सामना असेल. लोकांमध्ये रोड सेफ्टीबाबत जनजागृती करणे हे या मालिकेचे उद्दीष्ट आहे.