नवी दिल्ली - ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट लीने महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या फलंदाजीच्या तंत्राचे कौतुक केले आहे. लीने एका कार्यक्रमात सांगितले, की अनुभवी फिरकी गोलंदाज शेन वॉर्नसमोर सचिन इतका बलवान होता की तो त्याच्या इच्छेनुसार कोणत्याही ठिकाणी फटका खेळायचा. सचिन आणि वॉर्न यांच्यातील युद्ध खूप लोकप्रिय होते. आता ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट लीने या दोघांमध्ये सचिन सर्वोत्तम असल्याचे म्हटले आहे.
''वॉर्नला शॉर्ट पिच चेंडू टाकण्यासाठी सचिन प्रवृत्त करायचा. काही प्रसंगी तो बॅकफूटवर जाऊन चेंडूची वाट बघत सुंदर फटके खेळायचा. वॉर्न अत्यंत हुशार असल्याने हे काम फारच कमी फलंदाज करू शकले. परंतु सचिन तेंडूलकर हे बर्याच वेळा करत असे. जगातील अनेक फलंदाजांना त्रास देणारा वॉर्न सचिनपुढे अपयशी ठरला'', असे लीने म्हटले.
लीने सांगितले, की सचिनने अनेक वेळा आपल्या इशाऱ्यावर वॉर्नला नाचवले होते. वॉर्नविरुद्ध सचिनने अनेक संस्मरणीय खेळी खेळल्या आहेत. वॉर्न संघात असताना ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने खेळलेल्या 12 कसोटी सामन्यांमध्ये 60 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. यात 12 शतके आणि 5 अर्धशतकांचा समावेश आहे. वॉर्नच्या उपस्थितीत 17 एकदिवसीय सामन्यात त्याने 58.70 च्या सरासरीने 5 शतकांसह 998 धावा केल्या आहेत.