नवी दिल्ली - आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेसाठी आता अवघे 3 दिवस बाकी राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर क्रिकेटविश्वातील अनेक दिग्गजांनी आपली मते मांडण्यास सुरुवात केली आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या मते यंदाच्या विश्वकरंडक स्पर्धेत अफगाणिस्तानचा संघ आपल्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर सर्वांनाच चकित करुन सरप्राईज पॅकेज ठरू शकतो.
सचिन म्हणाला की, 'अफगाणिस्तानचा क्रिकेट संघ हा वेगाने सुधारणा करत आहे. त्यांच्याकडे चांगल्या फिरकी गोलंदाजांचा भरणा आहे, जे विरोधी संघाच्या दिग्गज फलंदाजांना माघारी धाडण्याची क्षमता ठेवतात.' यापूर्वी जगभर झालेल्या अनेक लीग स्पर्धांमध्ये राशिद खान, मुजीब उर रेहमान आणि मोहम्मद नबी या अफगाणिस्तानच्या खेळाडूंनीही चमकदार कामगिरी करुन आपला ठसा उमटवला आहे.
इंग्लंड आणि वेल्समध्ये ३० मे पासून विश्वकरंडक स्पर्धेला सुरूवात होणार असून अफगाणिस्तानचा पहिला सामना 1 जूनला बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे.
विश्वकरंडक स्पर्धेसाठी अफगाणिस्तानचा संघ
- अफगाणिस्तान - गुलाबदीन नाईब (कर्णधार), मोहम्मद शहजाद, नूर अली झादरान, हजरतुल्लाह जजाई, रहमत शाह, असघर अफगाण, हशमतुल्लाह शाहीदी, नजीबुल्लाह झादरान, समिउल्लाह शिनवारी, मोहम्मद नबी, राशिद खान, दौलत झादरान, आफताब आलम, हामिद हसन, मुजीब उर रहमान.