मुंबई - ऑस्ट्रेलियाचा दिग्गज कर्णधार रिकी पाँटिंगने आयसीसीच्या चार दिवसीय कसोटी सामन्याच्या कल्पनेला विरोध केल्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यानेही आपले मत दिले आहे. सचिनने आयसीसीच्या 'चार दिवसीय कसोटी' प्रस्तावाला विरोध केला असून आयसीसीने या प्रारुपासोबत छेडखानी करू नये, असे आवाहनही त्याने केले.
हेही वाचा - VIDEO : गुरूची 'आठवण' काढताना रडला न्यूझीलंडचा सर्वात यशस्वी कसोटी फलंदाज
मी कसोटी क्रिकेटचा समर्थक असल्याने मी या बदलाच्या सोबत नाही. ते आहे तसे खेळले गेले पाहिजे. जर त्याचे स्वरूप लहान झाले तर, कसोटी क्रिकेट हे मर्यादित क्रिकेटचा मोठा प्रकार म्हणून समोर येईल. जर तुम्ही दुसऱ्या दिवशी उपाहारापर्यंत फलंदाजी केली, तर तुमच्याकडे अडीच दिवसांचा वेळ शिल्लक राहील. त्यामुळे या कसोटीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. जगात असा कुठलाच गोलंदाज नसेल की जो पाचव्या दिवशीच्या खेळपट्टीवर गोलंदाजी करण्यास इच्छुक नसेल. एक दिवस कमी झाल्याने फिरकीपटू आणि वेगवान गोलंदाजांचे योगदान समोर येणार नाही. फिरकीपटूंना पाचव्या दिवशी गोलंदाजीची संधी न मिळणे म्हणजे वेगवान गोलंदाजांना पहिल्या दिवशी संधी न मिळण्यासारखेच आहे', असे सचिनने म्हटले.
रिकी पाँटिंगनेही कसोटीतील अशा बदलांच्या बाजूने नसल्याचेही सांगितले होते. आयसीसी पुढील फ्युचर टूर्स प्रोग्राममध्ये (एफटीपी) चार दिवसीय कसोटी सामने आणण्याचा विचार करत आहे. त्यामुळे व्यावसायिकतेसाठी मर्यादिक क्रिकेटमध्ये अधिक वेळ मिळू शकेल. पाँटिंगपूर्वी भारताचा कर्णधार विराट कोहली, सचिन तेंडुलकर, गौतम गंभीर, ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टीन लँगर, फिरकीपटू नॅथन लायन आणि ग्लेन मॅकग्रा यांनी चार दिवसांच्या कसोटी सामन्याबद्दल मतभेद व्यक्त केले होते.