दुबई - आयपीएलच्या प्लेऑफ फेरीतून तीन वेळाचा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्ज बाद झाला आहे. या घटनेनंतर संघाचा सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाडने चेन्नईच्या ड्रेसिंग रूमबाबत भाष्य केले. ''ड्रेसिंग रूममधील वातावरण अजूनही शांत आहे आणि चेन्नई स्पर्धेतून बाहेर पडल्याचे दिसत नाही'', असे ऋतुराजने म्हटले.
आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदा प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यात चेन्नईला अपयश आले. गुरुवारी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या सामन्यात चेन्नईने कोलकाता नाईट रायडर्सला सहा गडी राखून या स्पर्धेत पाचवा विजय नोंदवला. ऋतुराजने ५३ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ७२ धावा फटकावत संघाला विजय मिळवून दिला.
आपल्या संघातील शेन वॉटसनशी झालेल्या चर्चेदरम्यान गायकवाड म्हणाला, "अर्थातच मला माझा फॉर्म कायम ठेवायचा आहे आणि संघासाठी सामना जिंकण्याची इच्छा आहे. विजयी फॉर्म राखत आम्हाला या स्पर्धेचा शेवट करायचा आहे. पुढच्या वर्षी ही कामगिरी सुरू ठेवू. ड्रेसिंग रूममधील वातावरण खूप शांत आहे. आम्ही स्पर्धेतून बाहेर पडलो आहोत, असे वाटत नाही. जेव्हा आम्ही पहिला सामना जिंकला आणि आता जेव्हा आम्ही हा सामना जिंकलो तेव्हाचे वातावरण एकसारखेच आहे.''
ऑस्ट्रेलियाचा महान अष्टपैलू क्रिकेटपटू शेन वॉटसननेही गायकवाडचे कौतुक केले. वॉटसन म्हणाला, ''ऋतुराजची अशी चमकदार फलंदाजी पाहणे माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. आयपीएलसारख्या मोठ्या टप्प्यावर एखाद्या युवा खेळाडूने असे प्रदर्शन करणे खूप प्रभावी आहे." चेन्नईला आता अखेरचा सामना रविवारी किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या खेळायचा आहे.