बंगळुरु - आयपीएलमध्ये आज काळजाचा ठोका चुकवणाऱ्या सामन्यात बंगळुरुने चेन्नईचा अवघ्या एका धावेने पराभव केला. मध्यंतरी ही लढत एकतर्फी होईल असे वाटत होते. मात्र, धोनीच्या वादळी खेळीने सामन्याचा नुरच पालटला. त्याने उमेश यादवने टाकलेल्या शेवटच्या षटकात ३ षटकार( त्यातला एक मैदानाबाहेर) अन् एका चौकारासह तब्बल २४ धावा कुटल्या. त्याची ही ४८ चेंडूत नाबाद ८४ धावांची खेळी पुढचे अनेक वर्षे आठवणीत राहील. मात्र, शेवटच्या चेंडूवर त्याला त्याच्या संघाला विजय मिळवून देता आला नाही. अन् हा सामना आरसीबीने एका धावेने आपल्या खिशात घातला.
बंगळुरुच्या एम. चिन्नास्वामी मैदानावर झालेल्या या सामन्यात चेन्नईने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय चेन्नईच्या गोलंदाजांनी योग्य ठरवत बंगळुरूला १६१ धावांवर रोखले. मात्र, बंगळुरूच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली नसली तरी, गोलंदाजांनी त्याची कसर भरुन काढली. प्रत्युत्तरात, बंगळुरुच्या १६१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना, सलामीला आलेल्या शेन वॉटसन आणि ड्युप्लेसीस यांना डेल स्टेनने तग धरु दिला नाही. आपल्या पहिल्याच षटकाच्या पाचव्या चेंडूवर स्टेनने चेन्नईला पहिला धक्का दिला. त्यानंतर आलेल्या सुरेश रैनानेही संघ अन् चाहत्यांचा अपेक्षाभंग केला. स्टेननेच त्याचा शेवटच्या चेंडूवर अप्रतिम यॉर्कर टाकून त्रिफळा उडवला.
सामना आरसीबीकडे झुकलेला असे वाटत असतानाच चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आपले गियर बदलत गोलंदाजांची धुलाई सुरु केली. त्याने धोनी ४८ चेंडूत नाबाद ८४ धावा कुटल्या. मात्र, शेवटच्या चेंडूवर दोन धावांची गरज असताना उमेश यादवचा चेंडू त्याला ओळखता आला नाही. अन् विकेट किपर पार्थिव पटेलच्या हातात गेलेल्या चेंडूवर धाव घेण्याच्या प्रयत्नात शार्दुल ठाकूर धावबाद झाला. अन् चेन्नईने हा सामना एका धावेने आपल्या खिशात घातला.
तत्पुर्वी, प्रथम फलंदाजीस आलेल्या यजमान बंगळुरुने सावध सुरुवात करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिसऱ्याच षटकात दीपक चहरने कर्णधार कोहलीला धोनीकरवी झेलबाद केले. कोहली ९ धावांवर माघारी परतला.एबी डिव्हिलियर्सने या सामन्यातून पुनरागमन केले. त्याने बंगळुरूचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दुसरा सलामीवीर पार्थिव पटेलच्या एकाकी झुंजी मुळेच बंगळुरूने १६१ धावसंख्येपर्यंत मजल मारली.पटेलने 36 चेंडूत अर्धशतक झळकावले. पार्थिवचे हे आयपीएलमधले १७ वे अर्धशतक ठरले. तर, शेवटच्या दोन षटकात मोईन अलीने आक्रमक फलंदाजी करत बंगळुरू संघाला १६१ धावांपर्यंत पोहचवले. मोईन अली २६ धावा करून बाद झाला. तर चेन्नईकडून दिपक चहर आणि रविंद्र जडेजा यांनी दोन बळी टिपले.