ड्यूनेडिन - न्यूझीलंडचा आघाडीचा फलंदाज रॉस टेलरने बांग्लादेशविरुद्ध खेळण्यात येत असलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात इतिहास रचला आहे. तिसऱ्या सामन्यात टेलरने ६९ धावांची खेळी करत एकदिवसीय क्रिकेटमध्ये न्यूझीलंडकडून खेळताना सर्वाधिक धावा करण्याचा मान मिळवला आहे.
यापूर्वी न्यूझीलंडकडून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम माजी कर्णधार स्टिफन फ्लेमिंगच्या नावावर होता. त्याने वनडेत ८ हजार ७ धावा केल्या होत्या. मात्र बांग्लादेशविरुद्ध ६९ धावा केल्यामुळे टेलरच्या खात्यात ८ हजार २६ धावा जमा झाल्याने हा विक्रम आता रॉस द 'बॉस'च्या नावावर झाला आहे.
क्रिकेटविश्वात एक अव्वल दर्जाचा फलंदाज आणि 'बिग हिटर' म्हणून ओळख असलेल्या टेलरने २००६ मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. टेलरने न्यूझीलंडकडून खेळताना एकदिवसीय क्रिकेटमध्ये २१८ सामन्यांमध्ये न्यूझीलंडकडून सर्वाधिक २० शतके ठोकली आहेत.