नागपूर - टीम इंडिया सद्या बांगलादेश संघाविरुध्द टी-२० मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिला सामना बांगलादेशने तर दुसरा सामना भारताने जिंकला. तिसरा व अखेरचा सामना उद्या रविवारी १० नोव्हेंबरला नागपुरात होणार आहे. या सामन्यापूर्वी दोन्ही संघांनी जामठा येथील व्हीसीएच्या मैदानावर कसून सराव केला.
हेही वाचा - पाकला १० गड्यांनी धूळ चारून ऑस्ट्रेलियाने रचला इतिहास, १२ वर्षानंतर 'असं' घडलं..!
या सरावापूर्वी भारताचा कर्णधार रोहित शर्माची पत्रकार परिषद झाली. तेव्हा त्याने 'क्रिकेट हा खेळ अनिश्चिंततेने भरलेला आहे, त्यामुळे आम्ही फेव्हरिट जरी असलो तरी, भूतकाळात तुमचा रेकॉर्ड कितीही चांगला असला तरी त्याचा खूप फरक पडत नाही', असे म्हटले.
नागपूरची खेळपट्टी नेहमीच बॅटिंगसाठी पूरक राहिली असली तरी खेळपट्टी महत्त्वाची नाही. ज्या संघाचे खेळाडू आपले कौशल्य सिद्ध करतील तोच संघ चॅम्पियन ठरणार आहे. घरगुती क्रिकेट खेळल्याने खेळ सुधारतो असं म्हटलं जातं पण जोपर्यंत आंतराष्ट्रीय सामने खेळत नाही तोपर्यंत आपण कुठे स्टँड करतो आहे, हे कळत नसल्याचे मतही रोहितने व्यक्त केले आहे.
क्रिकेटच्या क्षेत्रात आज जितके ही मोठे खेळाडू झाले आहेत त्यांना सुद्धा पहिल्या-दुसऱ्या प्रयत्नात यश मिळालेलं नाही. कुणाला लवकर यश मिळाले असेल तर ते टिकवता आलं पाहिजे. भारतीय संघात जितके नवीन गोलंदाज आहेत, त्यांच्यात मला चांगले भविष्य दिसत आहे. हे खेळाडू जितके अधिक आंतराष्ट्रीय सामने खेळातील तितकाच त्यांचा खेळ बहरत जाईल. दोन सामन्यांत खराब कामगिरी झाली तर खेळाडूंवर दबाव येणं स्वाभाविक आहे, अशा परिस्थितीत त्यांनी संयम ठेवल्यास त्यांचा खेळ आणखी परिपक्व होणार असल्याचंही रोहितने म्हटले आहे.