नवी दिल्ली - माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांचा मुलगा आणि वकील रोहन जेटली यांची शनिवारी दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या (डीडीसीए) अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. या पदासाठी ज्यांनी अर्ज दाखल केले होते, त्यांनी आपली नावे मागे घेतली. रोहन जेटलींच्या नावाची अधिकृत घोषणा ९ नोव्हेंबरला केली जाईल.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख शनिवार (१७ ऑक्टोबर) पर्यंत होती. यानंतर निवडणूक अधिकारी नवीन बी. चावला यांनी उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली. आता ५ ते ८ नोव्हेंबर दरम्यान डीडीसीएचे चार संचालक आणि कोषाध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. ९ तारखेला मतमोजणी होणार असून या दिवशी निकाल जाहीर केला जाईल.
अॅडव्होकेट सुनील कुमार गोयल यांनी रोहन यांच्यापुढे उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यांनी माघार घेतली. कोषाध्यक्षपदासाठी पवन गुलाटी आणि शशी खन्ना यांच्यात लढत आहे. पवन हा भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरचा नातेवाईक आहे, तर शशी या बीसीसीआयचे माजी कार्यकारी अध्यक्ष सीके खन्ना यांच्या पत्नी आहेत.