शारजाह - दिल्ली कॅपिटल्स संघाच्या मधल्या फळीतील फलंदाज शिमरोन हेटमायर सध्या 'पुल शॉट' शिकत आहे. या फटका खेळण्यासाठी त्याला संघाचा प्रशिक्षक रिकी पाँटिंग मार्गदर्शन करत आहे. शुक्रवारी राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात हेटमायरने २४ चेंडूत ४५ धावा चोपल्या. या डावात त्याने पुल शॉटचा उपयोग पहिला षटकार मारण्यात केला.
हेटमायर म्हणाला, "रिकीबरोबर राहून आनंद झाला. तो एक चांगला माणूस आहे. तो सध्या माझ्या पुल शॉटवर काम करत आहे. गेल्या काही सामन्यात सर्व गोलंदाज मला आखुड टप्प्याचा चेंडू खेळवत होते. ते रिकीने पाहिले. म्हणूनच तो सध्या माझ्या पुल शॉटवर काम करत आहे. तो मला फिनिशरच्या भूमिकेत आणण्यास मदत करत आहे.''
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग आपल्या कारकिर्दीत उत्तम पुल शॉट खेळणारा खेळाडू म्हणून ओळखला जात होता. इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) शुक्रवारी राजस्थान रॉयल्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी झाला. या सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ८ बाद १८४ धावा केल्या. यात हेटमायरने ५ षटकार आणि एका चौकारासह ४५ धावा केल्या. प्रत्युत्तरात. राजस्थान रॉयल्स संघ आपले सर्व गडी गमावत केवळ १३८ धावांपर्यंतच मजल मारू शकला. दिल्ली कॅपिटल्सने ४६ धावांनी हा सामना जिंकला.