नवी दिल्ली - दिल्लीचा वेगवान गोलंदाज कंगिसो रबाडा पाठदुखीच्या त्रासामुळे आयपीएलमधून बाहेर पडला आहे. रबाडाचे आयपीएलमधून बाहेर पडणे दिल्ली संघाला मोठा झटका आहे. त्याची कमतरता दिल्लीच्या संघाला प्ले ऑफच्या सामन्यात नक्कीच जाणवेल, असे वक्तव्य प्रशिक्षक रिकी पाँटिग यांनी केले.
रबाडाने आयपीएलमध्ये भेदक गोलंदाजी करत दिल्लीला काही सामने एकहाती जिंकून दिले. त्याने १२ सामन्यात २५ गडी बाद करत पर्पल कॅपही मिळवली. विश्वचषक तोंडावर असल्याने दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने खरबदारीचा उपाय म्हणून रबाडाला मायदेशी बोलवून घेतले.
पुढे बोलताना पाँटिंग म्हणाला, रबाडाला माघारी बोलवण्याचा निर्णय हा दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाचा आहे. त्याला गेल्या काही दिवसांपासून कमरेच्या खाली दुखत होते. त्याच्यावर उपचार करण्यासाठी त्याला मायदेशी बोलवून घेण्यात आले आहे.
रबाडाची जागा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट भरून काढेल असा विश्वास पाँटिंगने व्यक्त केला आहे. बोल्ट हा जागतिक स्तरावरचा गोलंदाज आहे. मागील आयपीएलमध्ये त्याने दिल्लीकडून खेळताना चांगली कामगिरी केली होती.