लंडन - लॉर्ड्सवर रंगलेल्या अॅशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात स्टीव स्मिथला जोफ्रा आर्चरचा वेगवान चेंडू लागला. मानेवर आदळलेल्या या चेंडूने स्मिथ जमिनीवर कोसळला. ही घटना पाहून अनेकजण स्तब्ध झाले. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिगलासुद्धा या प्रकारामुळे भूतकाळातील एका घटनेची आठवण झाली आहे.
पाँटिगला २००५ च्या अॅशेस कसोटीची आठवण झाली. या कसोटीत इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टीव हार्मिसनने प्रभावी गोलंदाजी करताना पॉटिंग, मॅथ्यू हेडन, जस्टिन लँगर यांना जखमी केले होते. या घटनेची आठवण करुन देताना पाँटिग म्हणाला, 'ती सकाळ भयाण होती आणि काल (शनिवारी) जुन्या घटनेची आठवण झाली. मला आठवते मला जेव्हा चेंडू लागला होता तेव्हा मायकल वॉन आपल्या सहकाऱ्यांना सांगत होता की, कोणीही पाँटिगजवळ जाणार नाही. माझ्यासाठीही ते चांगले होते कारण, मी सुद्धा त्यांना दूर राहायला सांगितले असते.'
पाँटिग पुढे म्हणाला, 'आर्चर स्मिथला बाद करु शकला नाही. स्मिथने आपली विकेट गमावली नाही. त्याने आर्चरचा सामना केला. तो दुसऱ्या डावातही चांगली फलंदाजी करेल. कारण नेटमध्ये तुम्ही नेहमी जखमी होता. त्यामुळे कोणतीही गोष्ट तुमची मानसिकता बदलू शकत नाही.'
नेमके काय घडले -
दिवसाच्या दुसऱ्या सत्रात स्मिथ १५२ चेंडूत ८० धावांवर खेळत होता. तेव्हा जलदगती गोलंदाज जोफ्रा आर्चर ७७ वे षटक टाकण्यासाठी आला. या षटकातील दुसरा चेंडू त्याने बाउंसर टाकला. हा चेंडू स्मिथच्या हेल्मेटच्या डाव्या बाजूला त्याच्या मानेच्या जवळ लागला. त्यामुळे स्मिथ वेदनेने मैदानातच कोसळला.