दुबई - चेन्नई सुपर किंग्जचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा आयपीएलमध्ये २००० धावा आणि ११० बळी घेणारा पहिला खेळाडू ठरला आहे. शुक्रवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबादविरुद्ध झालेल्या सामन्यात जडेजाने ३५ चेंडूंत ५० धावांची खेळी केली. या खेळीत त्याने २ षटकार आणि ५ चौकार लगावले.
त्याशिवाय २००० धावा करणारा आणि लीगमध्ये ५०हून अधिक बळी घेणारा जडेजा हा चौथा क्रिकेटपटू ठरला आहे. या प्रकरणात तो शेन वॉटसन, कायरन पोलार्ड, जॅक कॅलिस यांच्या यादीत सामील झाला आहे. "आयपीएलच्या इतिहासातील ही दुहेरी कामगिरी करणारा पहिला क्रिकेटपटू ठरल्यामुळे मला आनंद झाला आहे. ही कामगिरी मला अधिक मेहनत घेण्यास प्रेरणा देईल. मला आशा आहे, की माझे कुटुंबीय आणि प्रेक्षक ज्यांना क्रिकेट आवडते त्यांना माझा अभिमान वाटेल", असे जडेजाने सांगितले.
३१ वर्षीय जडेजाने आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण १७६ सामने खेळले आहेत. त्याने चेन्नई सुपर किंग्जसह १०६, गुजरात लायन्सबरोबर २७, कोची टस्कर्ससह १४ आणि राजस्थान रॉयल्ससह २७ सामने खेळले आहेत.
दुबईच्या मैदानावर झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने चेन्नई सुपरकिंग्जवर ७ धावांनी मात केली. युवा खेळाडू प्रियम गर्ग आणि अभिषेक शर्मा यांच्या झुंजार खेळीमुळे सनराजझर्स हैदराबादने या सामन्यात २० षटकात ५ बाद १६४ धावा केल्या. तर, हैदराबादच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईच्या २० षटकांत ५ गडी बाद १५७ धावा झाल्या.