नवी दिल्ली - भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह संघात परतण्यासाठी सज्ज झाला आहे. पुढील वर्षाच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत तो गोलंदाजी करताना दिसेल. बुमराहला सप्टेंबर महिन्यात स्ट्रेस फ्रॅक्चर झाले होते. यामुळे तो मागील चार महिने क्रिकेटपासून लांब होता. दरम्यान, लंकेसोबतच्या मालिकाआधी बुमराह रणजी स्पर्धेत खेळणार आहे. पण त्याला या स्पर्धेत खेळण्यासाठी एक अट ठेवण्यात आली आहे.
बुमराहला रणजी स्पर्धेत खेळताना एका दिवसात फक्त १२ षटके टाकण्याची परवानगी देण्यात आली आहे. दुखापतीतून सावरल्यानंतर बुमराहने वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेदरम्यान संघासोबत नेटमध्ये सराव केला होता. आता तो रणजी स्पर्धेत खेळणार आहे. सूरतमध्ये केरळ विरुद्धच्या सामन्यात तो गुजरात संघाकडून सामना खेळणार आहे. महत्वाचे म्हणजे, भारतीय संघाचे निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद हे स्वत: सुरत येथील सामना पाहणार आहेत.
दरम्यान, भारतीय संघाचे फिजिओ नितीन पटेल यांनी बुमराहला गोलंदाजीसाठी हिरवा कंदील दिला आहे. पण, निवड समितीने गुजरात रणजी संघाचा कर्णधार पार्थिव पटेल याला बुमराहकडून दिवसाला १२ पेक्षा अधिक षटके गोलंदाजी टाकून घ्यायची नाहीत, असे सांगितले आहे. भारतीय संघ जानेवारी महिन्यात श्रीलंकेविरुद्ध टी-२० तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार आहे.
हेही वाचा - आफ्रिकेचा अष्टपैलू व्हेरनॉन फिलँडरची निवृत्तीची घोषणा
हेही वाचा - पाकिस्तानच्या संघाने विराटकडून शिकावे, पाक खेळाडूचा सल्ला