मुंबई - कोरोनामुळे बीसीसीआयने २९ मार्चपासून सुरू होणारी आयपीएल स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली आहे. पण सद्य स्थिती पाहता १५ एप्रिलनंतरही आयपीएल होण्याची शक्यता नाहीच, असे मत आयपीएलचे माजी चेअरमन राजीव शुक्ला यांनी व्यक्त केले आहे. राजीव शुक्ला यांनी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना मत व्यक्त केले.
राजीव शुक्ला यांनी सांगितलं, लॉकडाऊन पुढे वाढवण्यात येण्याची शक्यता आहे. जर लॉकडाऊन वाढले तर आयपीएल होण्याची शक्यता शून्य आहे. सद्य घडीला कोरोनाशी लढणे आणि लोकांचा जीव वाचवणे हे आपले पहिले कर्तव्य आहे. सरकार काय निर्णय घेते यावर सर्व बाबी अवलंबून आहेत.
आयपीएलचे आयोजन झाल्यास विदेशी खेळाडू यात सहभागी होतील का? असे विचारल्यावर शुक्ला यांनी सांगितलं, सद्य स्थिती पाहिल्यास आयपीएलचा एकही सामना होण्याच्या शक्यता नाहीत आणि विदेशी खेळाडूंना भारतात येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. यामुळे हा प्रश्नच उद्भवत नाही.
दरम्यान, केंद्र सरकारने १५ एप्रिलपर्यंतचे सर्व व्हिसा रद्द केले आहेत. देशात मागील २४ तासांमध्ये ५९१ कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. तर २० लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत भारतात ५८६५ कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. यात १६९ जणांचा मृत्यू तर ४७८ लोक कोरोनामुक्त झाले आहेत.
हेही वाचा - कोविड-१९ : सनराईजर्स हैदराबाद संघाची १० कोटींची मदत, वॉर्नरने केले कौतुक
हेही वाचा - 'व्हेंटिलेटर देऊ, तुम्ही दहशतवादी सोपवणार का?' नेटीझन्सचा शोएबला सवाल