अबूधाबी - आयपीएल २०२० स्पर्धेला सुरूवात होण्याआधीच राजस्थान रॉयल्स संघाला एक मोठा धक्का बसला आहे. रॉयल्सचा महत्वाचा खेळाडू बेन स्टोक्स यंदाच्या हंगामातील सुरुवातीचे काही सामने मुकण्याची शक्यता आहे. बेनच्या वडिलांवर ब्रेन कॅन्सरचे उपचार सुरु आहेत. यासाठी तो पाकिस्तानविरुद्धची कसोटी मालिका अर्ध्यातून सोडून न्यूझीलंडला परतला होता. आता तो आयपीएलचे सुरूवातीचे काही सामने मुकणार असल्याचे वृत्त आहे.
राजस्थान रॉयल्सच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बेन स्टोक्स त्याच्या वडिलांची काळजी घेण्यासाठी काही दिवस सोबत राहिल. यामुळे आम्ही सुरूवातीचे काही सामने तो उपलब्ध नसेल, असे गृहीत धरुन चाललो आहोत. वडिलांची प्रकृती खराब असल्याने आम्ही याकाळात त्याला संपर्कही करणार नाही. त्याला आपल्या परिवारासोबत वेळ घालवू देणे गरजेचे आहे. सर्व व्यवस्थित झाल्यानंतर मग आयपीएलमध्ये खेळण्याबाबत आम्ही चर्चा करु.
राजस्थान रॉयल्स संघाने बेन स्टोक्सला १२.५ कोटी रुपयांची बोली लावून आपल्या संघात घेतले आहे. २९ वर्षीय स्टोक्सने ६७ कसोटी, ९५ एकदिवसीय आणि २६ टी-२० सामने खेळली आहे. इंग्लंडला आयसीसी २०१९ विश्वकरंडक जिंकून देण्यात स्टोक्स मोलाचा वाटा होता. याशिवाय त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अॅशेस मालिकेत दमदार प्रदर्शन केले होते. कोरोना काळात खेळवण्यात आलेल्या वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेतही त्याने दोन शतक आणि एक अर्धशतक झळकावत संघाला विजय मिळवून दिला होता. असा महत्वाचा खेळाडू सुरूवातीचे काही सामने मुकणार असल्याने, रॉयल्सची चिंता वाढली आहे.
याआधी चेन्नई सुपर किंग्जचे सुरेश रैना, हरभजन सिंग, मुंबईचा लसिथ मलिंगा, दिल्ली कॅपिटल्सचा जेसन रॉय, ख्रिस वोक्स, रॉयल चॅलेंजरचा केन रिचर्डसन, कोलकाता नाइट रायडर्सचा हॅरी गर्नी यांनी विविध कारणास्तव स्पर्धेतून माघार घेतली आहे. दरम्यान, राजस्थानच्या खेळाडूंनी तेराव्या हंगामाची जोरदार तयारी सुरु केली आहे. राजस्थानचा संघ यंदाच्या हंगामात २२ सप्टेंबर रोजी चेन्नई सुपर किंग्जशी भिडणार आहे.
हेही वाचा - दिल्लीचा धडाकेबाज खेळाडू म्हणतोय, कोरोना झाला तरी मी लढायला तयार...
हेही वाचा - IPL 2020 : मुंबई इंडियन्ससाठी सलामीचा सामना धोक्याचा; पाहा आकडेवारी