गुवाहाटी - भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातला पहिला टी-२० सामना पावसामुळे खेळपट्टी ओलसर झाल्याने, रद्द करण्यात आला. पण गुवाहाटीच्या स्टेडियमची खेळपट्टी पावसामुळे ओली झाली नाही, तर खेळपट्टीवर झाकण्यात आलेल्या कव्हरला भोकं पडली होती. त्यातून पाणी आतमध्ये शिरले आणि खेळपट्टी ओलसर झाली असल्याचे समोर आले आहे.
भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक झाल्यानंतर पावसाला सुरूवात झाली. तेव्हा मैदानावरील कर्मचाऱ्यांनी खेळपट्टीवर कव्हरचे आच्छादन अंथरले. या कव्हरला भोकं पडलेली होती. या भोकांमधून पावसाचे पाणी आतमध्ये गेले आणि खेळपट्टी ओलसर झाली.
समालोचक आकाश चोप्राने एका क्रीडा वाहिनीशी बोलताना सांगितले की, 'ही क्षुल्लक चूक आहे. खेळपट्टी झाकण्यासाठी मैदानातील कर्मचाऱ्यांनी जी कव्हर घातली होती, त्यात काही ठिकाणी भोकं पडली होती. ज्यामधून काही प्रमाणात पाणी खेळपट्टीवर गेलं. हा निष्काळजीपणा आहे, आंतरराष्ट्रीय सामन्यात तुम्ही अशा चुका करुच शकत नाही.'
पंचांनी खेळपट्टीची अखेरची पाहणी ९ वाजून ४६ मिनीटांनी केली. तेव्हाही त्यांना खेळपट्टी खेळण्यायोग्य वाटली नाही आणि त्यांनी सामना रद्द करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. या मालिकेतला दुसरा सामना मंगळवारी इंदूरच्या मैदानावर होणार आहे.
दरम्यान, खेळपट्टीचा ओला भाग सुकवण्यासाठी मैदानातील कर्मचाऱ्यांनी प्रयत्नांची शर्थ केली. इस्त्री, हेअर ड्रायर यासारख्या अनेक गोष्टींचा वापर करुन हा भाग सुकवण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांचे प्रयत्न तोकडेच पडले. बीसीसीआयने या प्रकरणात आसाम क्रिकेट असोसिएशनवर नाराजी व्यक्त केली आहे.
हेही वाचा - सिडनी कसोटीत ऑस्ट्रेलियाची बाजी, न्यूझीलंडला व्हाईटवॉश
हेही वाचा - चहल, पंत आणि सॅमसनने केली आपल्याच फिटनेस ट्रेनरची धुलाई..! पाहा व्हिडिओ