नवी दिल्ली - भारताचा माजी फलंदाज राहुल द्रविडने विस्डेनने केलेल्या सार्वकालीन महान कसोटी फलंदाजांच्या सर्वेक्षणात सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे. विस्डेन इंडियाचे हे सर्वेक्षण फेसबुकवर करण्यात आले असून त्यामध्ये एकूण 11,400 मते पडली.
या मंतापैकी, 52 टक्के मते द्रविडच्या वाट्याला आली. यात भारताच्या एकूण 16 फलंदाजांचा समावेश होता. राहुलशिवाय सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर आणि विराट कोहलीसुद्धा या यादीमध्ये होते. गावस्कर यांनी तिसर्या स्थानासाठी कोहलीचा पराभव केला.
"द्रविडला एकूण चाहत्यांच्या मतापैकी 52 टक्के मते मिळाली. मंगळवारी सकाळपर्यंत तो मागे होता. द्रविडने आपल्या कारकीर्दीच्या दिवसांप्रमाणेच संघर्ष केला आणि बाजी मारली", असे विस्डेन इंडियाने म्हटले.
द्रविड आणि सचिनची गणना जगातील सर्वांत महान फलंदाजांमध्ये केली जाते. दोन्ही फलंदाजांच्या कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट सामन्यात 10,000 हून अधिक धावा आहेत.