मेलबर्न - अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियावर ८ गडी राखून विजय मिळवला. विशेष म्हणजे, भारतीय संघाने विराट कोहली आणि मोहम्मद शमी यांच्या अनुपस्थितीत हा विजय साकारला. अजिंक्य रहाणेने या सामन्यात कर्णधाराला साजेशी खेळी केली. त्याने पहिल्या डावात शतक आणि दुसऱ्या डावात नाबाद २७ धावा करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. शतकी खेळीसाठी अजिंक्यला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. भारताच्या या विजयानंतर संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी अजिंक्य रहाणेचे कौतूक केले आहे.
सामना संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना रवी शास्त्री म्हणाले की, अजिंक्य रहाणे खूप चतूर कर्णधार आहे. त्याला सामन्याचे पारडे कुठे झुकते याचा अंदाज येतो. माझ्या मते, त्याचा शांत स्वभाव नवोदित खेळाडूंसाठी ही फायदेशीर ठरला. उमेश यादव दुखापतीमुळे बाहेर गेल्यानंतरही मैदानावर एका प्रकारे आत्मविश्वास दिसत होता.
यावेळी शास्त्री यांना रहाणे आणि विराट कोहली यांच्या कर्णधार शैलीमधील फरक विचारले असता, शास्त्री यांनी सांगितले की, दोघेही चांगले खेळाडू आहेत. विराट मैदानात आक्रमक असतो तर अजिंक्य शांत असतो. हा त्यांचा स्वभाव आहे. विराटच्या मनात असते ते लगेच चेहऱ्यावर येते. पण अजिंक्य शांत राहून रणनिती आखतो. त्याला काय साध्य करायचे आहे हे त्याला माहिती असते.
दरम्यान, बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात विजय मिळवल्यानंतर विराट कोहलीने भारतीय संघाचे अभिनंदन केले आहे. यासोबत त्याने अजिंक्य रहाणेचे शतक महत्वाचे ठरल्याचे सांगितलं आहे.
हेही वाचा - रोहित संघात दाखल होण्यास सज्ज; 'या' खेळाडूला डच्चू मिळण्याची शक्यता
हेही वाचा - भारताच्या विजयाकडे एक उदाहरण म्हणून पहिलं जाईल - रवी शास्त्री