नवी दिल्ली - भारताचा अनुभवी ऑफस्पिनर रवीचंद्रन अश्विनने ऑस्ट्रेलिया दौऱ्याबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे. अश्विन म्हणाला, ''नुकत्यात पार पडलेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये सिडनीतील हॉटेलमध्ये असताना आमच्यासोबत एक वेगळी घटना घडली. या हॉटेलच्या लिफ्टमध्ये भारतीय खेळाडूंना ऑस्ट्रेलिया खेळाडूंसोबत जाऊ दिले नाही.'' भारतीय संघाचे क्षेत्ररक्षक प्रशिक्षक आर. श्रीधर यांच्यासोबत अश्विनने यूट्यूब चॅनेलवर चर्चा केली. या संवादादरम्यान अश्विनने या घटनेचा उलगडा केला.
हेही वाचा - धक्कादायक..! विमान अपघातात ४ फुटबॉलपटूंचा मृत्यू
संभाषणादरम्यान अश्विन म्हणाला, "सिडनी गाठल्यानंतर त्यांनी कडक निर्बंध घालून आम्हाला बंद केले. सिडनी येथे एक अनोखी घटना घडली. दोन्ही संघांचे खेळाडू एकाच जैव सुरक्षित वातावरणात होते. पण, जेव्हा ऑस्ट्रेलियाचे खेळाडू लिफ्टमध्ये होते, तेव्हा आम्हाला लिफ्टमध्ये जाण्यापासून थांबवण्यात आले. हे विचित्र होते. खरोखर, आम्हाला त्या वेळी वाईट वाटले. आमच्यासाठी ही गोष्ट पचवणे खूप कठीण होते."
ऑस्ट्रेलिया दौर्यावर खेळल्या गेलेल्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत अश्विनने शानदार गोलंदाजी करताना १२ बळी घेतले. त्याने सिडनी कसोटीत हनुमा विहारीसह भागीदारी करत भारताला पराभवापासून वाचवले.
पिछाडीनंतर मालिकेत बाजी
बॉर्डर-गावसकर मालिकेच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा मानहानीकारक पराभव झाला. यानंतर भारतीय संघाने अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात मेलबर्न येथे खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ८ गडी राखून विजय मिळवला. यानंतर हनुमा विहारी आणि आर. अश्विन यांनी संयम आणि जिद्दीने फलंदाजी करत सिडनी येथील तिसरा कसोटी सामना अनिर्णित राखला. चौथ्या कसोटी सामन्यात सांघिक खेळ करत भारतीय संघाने विजय मिळवला आणि मालिका २-१ ने जिंकली.