लाहोर - पाकिस्तानच्या कसोटी संघाचा कर्णधार अझर अलीने आपल्या क्रिकेट वस्तूंच्या लिलावातून 20 लाख पाकिस्तानी रुपये जमा केले आहेत. विशेष म्हणजे, अझर अलीची बॅट पुण्यातील एका म्युझियमने विकत घेतली आहे. कोरोना संकटातील पाकिस्तानमधील गरजूंना मदत करण्यासाठी अझरने आपली बॅट आणि जर्सी लिलाव करण्याची घोषणा केली होती. पुण्याच्या ब्लेड्स ऑफ ग्लोरी क्रिकेट म्युझियमने दहा लाख रुपये देऊन अझरची बॅट विकत घेतली आहे.
अझरने आपल्या दोन्ही वस्तूंची प्रारंभिक किंमत 10-10 लाख पाकिस्तानी रुपये ठेवली होती. त्याने या बॅटने वेस्ट इंडिजविरूद्ध तिहेरी शतक ठोकले होते. तर चॅम्पियन्स करंडक 2017 च्या अंतिम सामन्यात त्याने घातलेली जर्सीही लिलावात होती. या जर्सीवर पाकिस्तान संघातील सर्व खेळाडूंनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. कॅलिफोर्नियामध्ये राहणाऱ्या पाकिस्तानी काश विलानी यांनी या जर्सीसाठी रस दाखवला. यासाठी सर्वाधिक 11 लाखांची बोली लावली. न्यू जर्सीमध्ये राहणाऱ्या जमाल खान यांनी 1 लाख रुपयांची देणगी दिली आहे.
2016 मध्ये अझरने वेस्ट इंडिजविरुद्ध युएईमध्ये नाबाद 302 धावा केल्या होत्या. डे- नाईट कसोटी सामन्यात तिहेरी शतक झळकावणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला आहे.