पुणे - दक्षिण आफ्रिकेविरुध्दच्या सामन्यात एक चाहता सुरक्षारक्षकांची नजर चुकवून मैदानात घुसला आणि त्याने आपला थेट मोर्चा क्षेत्ररक्षण करत असलेल्या, रोहित शर्माकडे वळवला. रोहित शर्माचा आशीर्वाद घेण्यासाठी तो खाली वाकला असता, रोहितला सावरण्याची संधीच मिळाली नाही. तो थेट चाहत्याच्या अंगावर कोसळला. दरम्यान, हा सगळा प्रकार पाहून रोहितच्या बाजूला उभ्या असलेल्या अजिंक्य रहाणेला हसू आवरले नाही.
नेमकं काय घडलं -
दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज वर्नोन फिलॅंडर फलंदाजीसाठी मैदानात येत होता. त्याच्यापाठोपाठ एक चाहता मैदानात घुसला. मैदानात त्याने आपला मोर्चा रोहित शर्माकडे वळवला. तो रोहितच्या पाया पडण्यासाठी अचानक खाली वाकला असता, रोहितला नेमके काय करावे सुचले नाही. तो त्याला पाया पडण्यापासून रोखण्यासाठी खाली वाकताना त्याचा तोल गेला आणि तो त्या चाहत्याच्या अंगावर पडला.
या घटनेनंतर तात्काळ सुरक्षारक्षकांनी धाव घेत त्या अनाहूत चाहत्याला बाहेर काढले. दरम्यान, आफ्रिकेविरुध्दच्या दौऱ्यात यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. मोहालीच्या मैदानात एक चाहता विराट कोहलीसोबत सेल्फी घेण्यासाठी मैदानात पोहोचला होता.