मुंबई - आगामी विंडीज दौऱ्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. या दौऱ्यापूर्वी कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री पत्रकार परिषदेला सामोरे गेले. यावेळी टीम इंडियातील गटबाजीच्या आणि रोहितसोबतच्या वादावर विराटने मौन सोडले.
विराटने रोहित शर्माबरोबरचे मतभेदांचे वृत्त फेटाळून लावले आहे. तो म्हणाला, 'यशस्वी होण्यासाठी ड्रेसिंग रुममधले वातावरण खूप महत्त्वाचे असते. अलिकडे मी सुद्धा रोहितबरोबर माझे मतभेद झाल्याचे ऐकले. त्याच्याबरोबर हा वाद खरा असता तर आम्ही चांगली कामगिरी करु शकलो नसतो.'
विराटने दिलेल्या या उत्तराला धरूनच प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही आपले मत मांडले. 'खेळापेक्षा कोणीही मोठा नाही. मी, विराट किंवा इतर कोणीही मोठे नाही. संघाचे चांगले व्हावे या दृष्टीनेच त्यांनी कामगिरी केली. खरच वाद असतील तर तुम्हाला सर्व प्रकारामध्ये सातत्य ठेवता येत नाही. मी पण ड्रेसिंग रुमचा भाग होतो आणि तिथे असे काहीही घडलेले नाही. ही चर्चा निव्वळ मूर्खपणाची आहे.' असे रवी शास्त्री म्हणाले.
विराटने संघाच्या कामगिरीवरही भाष्य केले. तो म्हणाला, 'मागच्या चार वर्षांपासून आम्ही संघाला सातव्या स्थानावरुन पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी मेहनत घेतली. अशा चर्चांमध्ये काहीही उरलेले नाही. तुम्हीच ड्रेसिंगरुममध्ये येऊन एकदा बघा आणि तेथे असणाऱ्या वातावरणाची जाणीव करुन घ्या.'
वेळापत्रकानुसार वेस्ट इंडीज आणि भारतीय संघात 3 ते 6 ऑगस्ट या कालावधीत टी-20 मालिका होईल. त्यानंतर 8 ते 14 ऑगस्ट या कालावधीत तीन एकदिवसीय सामने आणि 22 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर या कालावधीत दोन कसोटी सामने खेळवण्यात येणार आहेत.