मेलबर्न - ऑस्ट्रेलियात बुश फायर रिलीफ फंडसाठी झालेल्या सामन्यात रिकी पाँटिंगच्या संघाने अॅडम गिलख्रिस्टच्या संघावर एक धावाने विजय मिळवला. नाणेफेक जिंकून गिलख्रिस्टच्या संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा पाँटिंगच्या संघाने १० षटकात ५ बाद १०४ धावा केल्या होत्या. विजयासाठी १०५ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या गिलख्रिस्ट संघाला १० षटकात ६ बाद १०३ धावांपर्यंत मजल मारता आली.
पाँटिंग संघाकडून खेळताना वेस्ट इंडिजचा महान डावखुरा फलंदाज ब्रायन लाराने सर्वाधिक ३० धावा केल्या. त्याने ११ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांसह ३० धावा केल्या. तर कर्णधार पाँटिगने नाबाद २६ धावा आणि मॅथ्यू हेडनने १६ धावा केल्या. गिलख्रिस्ट संघाकडून शेन वॉटसनने ३० धावा केल्या. त्याने ९ चेंडूत २ चौकार आणि ३ षटकार लगावले. सायमंड्सने १३ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांसह २९ धावा केल्या. भारताचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंहला ६ चेंडूत २ धावा करता आल्या.
दरम्यान, या सामन्यात रिकी पाँटिंग संघाचा प्रशिक्षक भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर होता. या सामन्याच्या माध्यमातून मिळालेला पैसा ऑस्ट्रेलियातील जंगलाला लागलेल्या आगीतील पीडितांना दिला जाणार आहे.
सचिन तेंडुलकरला ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेटर एलिस पेरीने एक षटक फलंदाजी करण्याची विनंती केली. तेव्हा तो पुन्हा हातात बॅट घेऊन मैदानात उतरला. पाँटिंग एकादश आणि गिलख्रिस्ट एकादश यांच्यातील चॅरिटी सामन्यातील इनिंग ब्रेकदरम्यान सचिनने एलिसच्या गोलंदाजीचा सामना केला. त्याने तिच्या पहिल्या चेंडूवर खणखणीत चौकार लगावला.
हेही वाचा - विजयी भव..! सचिन, विराटसह सिनियर खेळाडूकडून ज्युनिअर संघाला शुभेच्छा
हेही वाचा - IND vs NZ : जडेजाची झुंज अपयशी, सामन्यासह भारताने मालिका गमावली