मुंबई - कोरोनाविरुद्ध लढ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या आवाहनाला देशवासियांसह क्रीडा विश्वातून चांगला प्रतिसाद मिळाला. खेळाडूंनी रात्री ९ वाजता लाईट बंद करुन दिवे, मेणबत्ती आणि मोबाईलचे फ्लॅश चालू करत आपला पाठींबा दर्शवला. भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेनेही मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत आपल्या घराबाहेर एक दिवा लावला.
अजिंक्यने, दिवा लावतानाचा फोटो त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर केला आहे. या फोटोला त्याने, 'हे दिवसही जातील !' अशा आशयाचे कॅप्शन दिले आहे. दरम्यान, अजिंक्यने कोरोना लढ्यासाठी मदत केली आहे. त्याने मुख्यमंत्री सहायता निधीत १० लाखांचे दान दिले आहे.
![pm modis light lamp campaign support By ajinkya rahane](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/6679725_kkkre.jpg)
दरम्यान मोदींनी, कोरोनाच्या अंधःकारामधून बाहेर काढण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. रविवारी ५ एप्रिलला आपल्या घरातील सर्व लाईट्स बंद करून मेणबत्ती, दिवा, टॉर्च किंवा मोबाईलची टॉर्च लावा. यामुळे चारही दिशांना दिव्यांचा झगमगाट होईल. यातून आपल्या एकतेचा संदेश जाईल, असे आवाहन केले होते.
मोदी यांच्या या आवाहनाला सचिन तेंडुलकर, विराट कोहली, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, हिमा दास, मेरी कोम, मनिका बत्रा, सायना नेहवाल, हार्दिक पांड्या, कृ्णाल पांड्या, सुरेश रैना, लोकेश राहुल, विरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग, शिखर धवन, संजू सॅमसन, मोहम्मद कैफ, पी. व्ही. सिंधू, बजरंग पूनिया, गीता फोगाट, बबिता फोगाट आणि भारतीय फुटबॉल संघाचे सर्व खेळाडूंनी दिवा, मेणबत्ती लावून पाठिंबा दिला आहे.
हेही वाचा - लढा कोरोनाशी : मोदींच्या आवाहनाला क्रीडा क्षेत्रातून प्रतिसाद, खेळाडूंनी केली दिव्यांची आरास
हेही वाचा - लॉकडाऊनमध्ये 'फुलराणी' काय करते?, पहा व्हिडिओ