अहमदाबाद - तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताच्या फिरकीसमोर इंग्लंड संघाने शरणागती पत्कारली. इंग्लंडचा पहिला डाव अवघ्या ११२ धावांवर आटोपला. 'गली बॉय' अक्षर पटेल याने ६ तर अनुभवी रविचंद्रन अश्विनने ३ गडी बाद करत इंग्लंडला 'सळो सळो की पळो' करून सोडले. सलामीवीर जॅक क्रॉलीचे अर्धशतक वगळता इतर कोणताही फलंदाज फारशी चमक दाखवू शकला नाही.
इंग्लंडचा कर्णधार जो रूट याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण कर्णधार रूटचा हा निर्णय अंगलट आला. आपला १००वा सामना खेळणारा इशांत शर्मा याने इंग्लंडचा सलामीवीर डॉम सिब्लीला शून्यावर माघारी धाडले. त्यानंतर जॉनी बेअरस्टो मैदानात आला. त्याला अक्षर पटेलने शून्यावर माघारी धाडले.
इंग्लंडला सुरूवातीलाच दोन धक्के बसल्याने भारतीय गोलंदाजांचा आत्मविश्वास दुणावला. पण त्यानंतर कर्णधार जो रूट आणि जॅक क्रॉली या दोघांनी संयमी फलंदाजी करत डाव सावरला. सलामीवीर जॅक क्रॉलीने शानदार अर्धशतक केले. यानंतर अश्विनने कर्णधार जो रूटला बाद करत इंग्लंडला मोठा धक्का दिला. रुटने १७ धावा केल्या. रुट पाठोपाठ क्रॉली देखील बाद झाला. ५३ धावांवर अक्षर पटेल याने त्याला पायचित केलं. इंग्लंडची अवस्था चहापानापर्यंत २७ षटकात ४ बाद ८१ अशी झाली होती.
चहापानानंतर देखील इंग्लंडची गळती थांबली नाही. मधल्या फळीतील फलंदाज ओली पोप (१), बेन स्टोक्स (६) अपयशी ठरले. यानंतर इंग्लंडची अवस्था आणखी बिकट झाली. इंग्लंडचे शेपूट अश्विन-पटेल जोडीने गुंडाळले. अक्षर पटेलने ३८ धावांत ६ गडी बाद केले. तर आर अश्विनने २६ धावांत ३ गड्यांना तंबूत धाडलं. १०० वा सामना खेळणाऱ्या इशांतला एक गडी बाद करता आला.
हेही वाचा - भारताचे माजी दिग्गज क्रिकेटर बेदी यांच्यावर बायपास सर्जरी; जाणून घ्या अपडेट
हेही वाचा - IND vs ENG : नरेंद्र मोदी स्टेडियम सुविधांनी आहे सुसज्ज