नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट विश्वात 'स्विंगचा किंग' अशी ओळख निर्माण केलेल्या इरफान पठाणने शनिवारी क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली. गोलंदाज म्हणून संघात पदार्पण केलेल्या इरफानने फलंदाजीतही छाप सोडली. निवृत्ती घेतल्यानंतर इरफानने आपली खंत व्यक्त केली.
हेही वाचा - निवृत्तीच्या बाबतीत मलिंगाने केले मोठे विधान, म्हणाला...
'वयाच्या २७-२८ मध्ये लोक करियरची सुरूवात करतात आणि माझं याच वयात करियल संपलं. त्यावेळी मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३०१ बळी घेतले होते. मला याची खंत आहे. मला अजून जास्त सामन्यात खेळायचे होते. धावाही जमवायच्या होत्या. शिवाय, मला माझ्या बळींची संख्या ५००-६०० पर्यंत घेऊन जायची होती. मात्र, तसे होऊ शकले नाही. कारकीर्दीच्या शिखरावर जास्त संधी मिळाल्या नाहीत. कारणे काहीही असो, तसं झालं नाही. कोणतीही तक्रार नाही पण, मागे वळून पाहिल्यावर मला वाईट वाटतं. २०१६ नंतर मला वाटलं की मी कधीही भारताकडून खेळू शकणार नाही. मी सर्वोत्कृष्ट अष्टपैलू होता आणि जेव्हा मी निवड समितीशी बोललो तेव्हा ते माझ्या गोलंदाजीवर फारसे खूश नव्हते', असे इरफानने म्हटले.
२००८ साली पर्थ येथे झालेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल इरफानला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. इरफानने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २९ कसोटी, १२० एकदिवसीय आणि २४ टी-२० सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने कसोटीत ११०५ धावा आणि १०० विकेट्स, एकदिवसीय मध्ये १५४४ धावा आणि १७३ विकेट्स आणि टी-२० मध्ये १७२ धावा आणि २८ विकेट्स घेतल्या आहेत.