लाहोर - जेव्हा भारताची इच्छा असेल तेव्हा द्विपक्षीय मालिका खेळण्यास पाकिस्तान तयार आहे, पण त्यासाठी आम्ही भारताच्या मागे धावणार नाही, असे पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे (पीसीबी) अध्यक्ष एहसान मणी म्हणाले आहेत. क्रिकेट लेखक पीटर ओबोर्न आणि रिचर्ड हेलर यांच्यासमवेत झालेल्या संभाषणादरम्याव मणी यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
''आम्ही नेहमीच खेळायला तयार आहोत, असे आम्ही बीसीसीआयला सांगितले आहे. पण, आम्ही त्यांच्यामागे धावणार नाही, हा त्यांचा निर्णय आहे. जेव्हा ते खेळायला तयार असतील, तेव्हा आम्ही खेळू'', असे मणी म्हणाले आहेत.
ते पुढे म्हणाले, "जेव्हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होतो, तेव्हा या सामन्यापेक्षा दुसरा कोणताही सामना जगभरात दिसून येत नाही. जेव्हा भारत आणि पाकिस्तान आयसीसी स्पर्धेत खेळतात तेव्हा सुमारे लाखो लोक पाहतात. स्पष्टपणे हे सामने लोकांना हवे आहेत, पण काही देशांच्या नेत्यांना ते नको आहेत."
भारत आणि पाकिस्तान आयसीसी आणि एशियन क्रिकेट काऊन्सिलमध्ये (एसीसी) खेळत असतात. पण 2012-12 पासून या दोन संघात द्विपक्षीय मालिका खेळली गेलेली नाही. या दोघांमध्ये शेवटची कसोटी मालिका 2007-08 मध्ये खेळली गेली होती.