नवी दिल्ली - २०११च्या विश्वकरंडक स्पर्धेचा नायक असलेल्या युवराज सिंगने मागील वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. युवराजने भारताला अनेक सामने जिंकवून दिले. जगभरातील महान अष्टपैलू क्रिकेटपटूंमध्ये त्याचे नाव घेतले जाते. निवृत्तीच्या एका वर्षानंतर, पंजाब क्रिकेट असोसिएशनने युवराजला पुन्हा एकदा पंजाब संघासाठी खेळण्यासाठी गळ घातली आहे.
पंजाब क्रिकेट असोसिएशनचे सचिव पुनीत बाली यांनी युवीला ही विनंती केली. ते म्हणाले, ''पाच-सहा दिवसांपूर्वी आम्ही युवराजला हा प्रस्ताव दिला होता. आता आम्ही त्याच्या उत्तराची वाट पाहत आहोत. त्याने निवृत्ती मागे घेऊन पुन्हा खेळायला सुरुवात केली, तर पंजाब संघासाठी ती खरंच चांगली गोष्ट असेल. तो खेळाडूंना मार्गदर्शनही करु शकतो.''
निवृत्तीनंतर, युवराज कॅनडामधील ग्लोबल टी-२० आणि अबु धाबी येखील टी-२० लीगमध्ये सहभागी झाला होता. युवराजने २०१७मध्ये वेस्ट इंडिजविरूद्ध भारतीय संघासाठी अखेरचा सामना खेळला. त्यावर्षी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. त्याने ११ एकदिवसीय सामन्यांमध्ये ३७२ धावा केल्या. यात त्याची इंग्लंडविरुद्ध कटकमध्ये खेळलेली १५० धावांची खेळीही समाविष्ट आहे.
२००७साली झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेत युवराज सिंहने आक्रमक फलंदाजी केली होती. या स्पर्धेत त्याने इंग्लंडचा गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडला सहा चेंडूत सहा षटकार ठोकण्याचा पराक्रम केला आहे. २०११च्या विश्वकरंडक स्पर्धेतही युवराजने मोलाची भूमिका पार पाडली आहे. युवराजने १० जून २०१९ला आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घोषीत केली. युवराजने भारताकडून ३०४ एकदिवसीय सामने, ४० कसोटी आणि ५८ टी-२० सामने खेळले आहेत.