नवी दिल्ली - ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीत १०० बळी पूर्ण केले आहेत. ऑस्ट्रेलियाकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान १०० बळी घेण्याच्या बाबतीत कमिन्स सहाव्या स्थानावर आहे.
हेही वाचा - VIDEO : What a catch! ...जडेजाच्या झेलमुळे क्रीडाविश्व अचंबित
दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेचा पहिला सामना पर्लच्या मैदानावर खेळला गेला. ज्यामध्ये दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला ७४ धावांनी पराभूत केले. या सामन्यात कमिन्सने ३ बळी घेतले. १०० बळींचा आकडा गाठण्यासाठी कमिन्सला ६२ सामने खेळावे लागले.
या सामन्यात डेव्हिड मिलरला बाद करत त्याने हा टप्पा गाठला. एकदिवसीय सामन्यांव्यतिरिक्त, कमिन्सने कसोटीत १४३ आणि टी-२० मध्ये ३६ बळी घेतले आहेत.
ऑस्ट्रेलियाकडून सर्वात वेगवान १०० बळी घेण्याचा विक्रम वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कच्या नावावर आहे. त्याने ५२ सामन्यात १०० बळी पूर्ण केले आहेत. त्याच्याशिवाय ब्रेट लीने ५५ सामन्यात तर, आणि डेनिस लिली, शेन वॉर्न आणि नॅथन ब्रॅकन यांनी ६० सामन्यांत १०० बळी घेतले आहेत.
कमिन्स हा २०१९ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला होता. यावर्षी कमिन्सने कसोटी क्रिकेटमध्ये एकूण ५९ बळी टिपले. कमिन्स यंदाच्या आयपीएलमध्ये खेळणारा सर्वात महागडा खेळाडू आहे. त्याला कोलकाता नाईट रायडर्सने १५.५ कोटी रुपये मोजून संघात घेतले आहे.