मेलबर्न - यंदाचे वर्ष ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्ससाठी खास ठरले. कमिन्स हा २०१९ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे. यावर्षी कमिन्सने कसोटी क्रिकेटमध्ये एकूण ५९ बळी टिपले. या यादीत ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लायन कमिन्सपेक्षा १४ बळींनी पिछाडीवर आहे.
हेही वाचा - शोएब अख्तरची 'पलटी'...म्हणाला, 'मी तसं कधीच बोललो नव्हतो'
इतकेच नव्हे तर कमिन्स यावर्षी सर्व स्वरुपात मिळून सर्वाधिक विकेट्स घेणारा खेळाडू ठरला आहे. यावर्षी त्याने एकूण ९९ आंतरराष्ट्रीय बळी घेतले. कसोटी सामन्यात त्याने ५९, एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३१ तर, टी-२० क्रिकेटमध्ये त्याच्या खात्यात ९ बळींची नोंद आहे. भारताचा मोहम्मद शमी या यादीत दुसर्या क्रमांकावर आहे. त्याने ३० आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून त्यात त्याने ७७ बळी घेतले आहेत. शिवाय, यंदा शमी एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. त्याने एकदिवसीय सामन्यात ४२ बळी घेतले आहेत.
न्यूझीलंडविरुद्ध मेलबर्न क्रिकेट मैदानावर कमिन्सने पहिल्या डावात पाच विकेट्स घेतल्या. आयपीएलच्या लिलावात सर्वात महागडा खेळाडू ठरल्याने त्याचे हे वर्ष अजून उत्तम गेले. त्याला कोलकाता नाईट रायडर्सने १५.५ कोटी रुपये मोजून संघात घेतले आहे.