मुंबई - भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज पार्थिव पटेलने आज बुधवारी क्रिकेटच्या सर्व प्रारूपांतून निवृत्ती जाहीर केली. ३५ वर्षीय पार्थिवने भारताकडून २५ कसोटी, ३८ एकदिवसीय आणि २ टी-२० सामने खेळले आहेत. यात त्याने अनुक्रमे ९३४, ७३६, ३६ धावा केल्या आहेत.

पार्थिव पटेलने आज आपल्या १८ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीला अलविदा केला. पार्थिवने वयाच्या केवळ १७व्या वर्षी (१७ वर्ष, १५३ दिवस) २००२ साली इंग्लंडविरुध्दच्या कसोटी सामन्यातून भारतीय संघात पदार्पण केले होते. इतक्या कमी वयात भारताकडून आतंरराष्ट्रीय सामना खेळणारा तो पहिलाच क्रिकेटपटू ठरला.

हेही वाचा - IND vs AUS ३rd T२० : शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा भारतावर 12 धावांनी विजय
पार्थिवने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये गुजरातकडून १९४ सामने खेळले आहे. माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी पार्थिव पटेलचा समकालीन खेळाडू होता. धोनीने २००४मध्ये भारतीय संघात 'एन्ट्री' घेतली. त्यामुळे पार्थिवचे स्थान धोक्यात आले असे म्हटले जाते. त्यावेळी दिनेश कार्तिकसारखा प्रतिस्पर्धीही भारतीय संघात जागा मिळवण्यासाठी धडपड करत होता.

दोन वर्षांपूर्वी खेळला शेवटचा सामना -
पार्थिव पटेलने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना जानेवारी २०१८मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटीत खेळला होता. यामध्ये त्याने पहिल्या डावात २ आणि दुसऱ्या डावात १६ धावा केल्या होत्या.