कराची - पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने हिंदू क्रिकेटपटूसोबत पाकचे खेळाडू भेदभाव करत होते, असा गौप्यस्फोट केला आहे. त्याने 'गेम ऑन है' या 'टीव्ही' शोमध्ये ही गोष्ट सांगितली. यावेळी पाकिस्तानचा माजी कर्णधार रशिद लतिफ आणि माजी फलंदाज आसिम कमाल हेही उपस्थित होते. दरम्यान, शोएबच्या गौप्यस्फोटाने पाकिस्तानच नाही तर जागतिक क्रिकेटमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
'टीव्ही' शोमध्ये बोलताना शोएबने सांगितले की, 'पाकिस्तानच्या संघात दानिश कनेरिया हिंदू असल्याने त्याच्यावर कायम अन्याय करण्यात आला. त्याने संघासाठी अनेक गडी बाद केले. तसेच त्याने अनेक सामने आणि मालिकाही जिंकवून दिल्या, पण तरीही त्याला आपल्याबरोबर जेवताना पाहून खेळाडूंना राग येत असे. अशा कारणांमुळे दानिशची कारकिर्द अल्पावधीतच आटोपली, नाहीतर त्याने जास्त काळ संघाची सेवा केली असती.'
पाकिस्तानच्या संघासाठी मोहम्मद युसूफने १२ हजार धावा केल्या. मात्र, त्याला सन्मान मिळाला नाही. तो देवाची देणगीच होता. पण ही देणगी पाकिस्तानच्या संघाला चांगल्या पद्धतीने सांभाळता आली नाही. त्यालाही पाकिस्तानचे खेळाडू त्रास द्यायचे. यावरून माझे तीन-चार खेळाडूंशी भांडण झाल्याचेही शोएबने सांगितले.
दरम्यान, दानिश कनेरियाने ६१ कसोटी आणि १८ एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानचे प्रतिनिधीत्व केले आहे. यात त्याने कसोटीत २६१ तर एकदिवसीयमध्ये १५ बळी घेतले आहेत.
हेही वाचा - पाकच्या 'पंग्या'वर भारताचा दंगा, बीसीसीआयने घेतला 'हा' निर्णय
हेही वाचा - VIDEO : बोल्टचा वेगवान चेंडू... स्टम्प हवेत, फलंदाज जमिनीवर