नवी दिल्ली - ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पाकिस्तान संघाची सुमार कामगिरी झाली. यजमान ऑस्ट्रेलियाने टी-२० मालिकेसह कसोटी मालिकेत पाकचा सुपडासाफ केला. ब्रिस्बेन कसोटी सामना यजमान ऑस्ट्रेलियाने १ डाव ५ धावांनी जिंकला. त्यानंतर दिवस-रात्र पद्धतीने खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या सामन्यात १ डाव ४८ धावांनी पाकवर मात केली. पाकच्या या पराभवानंतर खेळाडूंसह नवनियुक्त प्रशिक्षक आणि निवड समितीचे प्रमुख मिसबाह-उल-हक टीकेचा धनी बनला आहे.
विशेष म्हणजे, पाकिस्तानच्या नावे एक लाजिरवाणा विक्रम झाला आहे. एका देशात सर्वाधिक वेळा कसोटी सामन्यात पराभूत होणाऱ्या संघाच्या यादीत पाकिस्तानने अव्वलस्थान पटकावलं आहे. पाकिस्तान ऑस्ट्रेलियात १९९९ पासून ते २०१९ पर्यंत एकूण १४ कसोटी सामने पराभूत झाला आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर बांगलादेशचा संघ असून २००१ ते २००४ या काळादरम्यान, बांगलादेशला १३ कसोटी सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. पराभवाच्या यादीत भारताचा तिसरा क्रमांक असून भारतीय संघ ऑस्ट्रेलियात १९४८ ते १९७७ दरम्यान, ९ सामन्यात पराभूत झाला आहे.
पाकच्या पराभवाबाबत बोलताना प्रशिक्षक मिसबाहने सांगितलं की, 'यासिर शाह आणि अब्बास सारखे चांगले खेळाडू आमच्याकडे होते. तसेच अझहर अली सारखा महत्वाचा फलंदाज आमच्याकडे आहे. मात्र, आम्ही ऑस्ट्रेलियावर दबाव टाकण्यात असमर्थ ठरलो. हेच आमच्या पराभवाचे कारण आहे. आता आम्हाला परिस्थितीनुसार गोलंदाजी आणि फलंदाजी करायला यायला हवे, यासाठी आम्ही प्रयत्न करु.'
हेही वाचा - कसोटी अजिंक्यपद स्पर्धा : गुणतालिकेत ऑस्ट्रेलियाची मुसंडी, भारत 'या' स्थानावर
हेही वाचा - IPL२०२०: विश्व करंडकात 'स्टंप' तोडणाऱ्या वेगवान गोलंदाजाची आयपीएलमधून माघार