नवी दिल्ली - पाकिस्तानचा माजी फिरकीपटू दानिश कनेरियाने अयोध्येला येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. रामजन्मभूमीचा वादाचा न्यायालयात निपटारा झाल्यानंतर ५ ऑगस्टला भूमिपूजनाचा ऐतिहासिक सोहळा अयोध्येत पार पडला. राम मंदिराच्या भूमिपूजनाचा हा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यावेळी उपस्थित होते.
या सोहळ्यानिमित्त कनेरियाने आनंद व्यक्त केला होता. हा एक आनंदाचा क्षण असून जगभरात आनंदाची लाट असल्याचे कनेरियाने सांगितले. भगवान रामने आमंत्रित केले तर, मी निश्चितपणे अयोध्येत येऊन रामाचे दर्शन घेईन, असे तो एका वृत्तसंस्थेला म्हणाला.
कनेरियाने म्हटले, "एक धार्मिक व्यक्ती असल्याने, मी हिंदू धर्म आणि रामाचे अनुसरण करतो. मी रामाला मानतो आणि त्यांनी मला सांगितलेल्या मार्गावर जाण्याचा प्रयत्न करतो. लहानपणापासूनच आपण रामायण पाहिले आहे. आपण त्यांचे जीवन आणि आदर्श यांची पूजा करतो. जर रामाने मला बोलावले तर मी नक्कीच भारतात येईन. आमच्यासाठी ते एक धार्मिक स्थळ आहे आणि संधी मिळाली तर मला नक्कीच यायला आवडेल.''
पाकिस्तान क्रिकेट संघात हिंदू क्रिकेटपटू असण्याचा अर्थ काय असा सवाल केला असता तो म्हणाला, "पाकिस्तान क्रिकेट संघाच्या वतीने खेळणे हा माझा सन्मान आहे. हिंदू क्रिकेटपटू म्हणून पाक संघाचे प्रतिनिधित्व करणे आणि संघासाठी सामना जिंकून देणे ही माझ्यासाठी अभिमान आणि सन्मानाची गोष्ट आहे. "
तो पुढे म्हणाला, "लोक माझ्यावर रिलिजन कॉर्ड खेळत असल्याचा आरोप करतात. माझा कोणताही व्यवसाय नाही किंवा मी रिलिजन कॉर्ड खेळत नाही. माझी तक्रार फक्त पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे आहे आणि त्यांच्या दुटप्पीपणाबद्दल आहे. पाकिस्तान बोर्डाने इतर खेळाडूंशी केलेला व्यवहार खूप चांगला आहे, पण माझ्याबाबतीत तसे नाही. याचे मला फार वाईट वाटते."
दानिश कनेरिया पाकिस्तानच्या संघाकडून खेळणारा दुसरा हिंदू खेळाडू असून त्याचे मामा अनिल दलपत हेही पाकिस्तानच्या संघात खेळले होते. दानिश कनेरियाने ६१ कसोटी आणि १८ एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले आहे. यात त्याने कसोटीत २६१ तर एकदिवसीय सामन्यांत १५ बळी घेतले.