मुंबई - पाकिस्तानचे दिग्गज फिरकीपटू अब्दुल कादिर यांचे शुक्रवारी वयाच्या ६३ व्या वर्षी निधन झाले. त्यांनी लाहोरमध्ये अखेरचा श्वास घेतला. कादिर हे आपल्या फिरकीच्या जोरावर मातब्बर फलंदाजांची भंबेरी उडवली होती. त्यांच्या निधनानंतर क्रिकेट जगतातून शोक व्यक्त केला जात आहे. भारताचा दिग्गज माजी फलंदाज सचिन तेंडूलकरनेही कादिर यांच्या गोलंदाजीचा सामना केला आहे. कादिर यांनी सचिनविषयीचा खास किस्सा सांगितला होता.
अब्दुल कादिर यांनी वर्षभरापूर्वी झालेल्या एका कार्यक्रमात सांगितले की, सचिनने नुकतेच आंतराराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तो कारकिर्दीच्या सुरुवातीलासुध्दा 'चॅलेंज'पासून मागे हटत नव्हता. कादिर यांनी यावेळी एका सामन्यावेळीचा प्रसंग सांगितला.
पाकिस्तानच्या पेशावरमध्ये झालेल्या एका सामन्यात सचिनने मला ४ षटकार ठोकले होते. यांची आठवण अब्दुल कादिर यांनी सांगितली होती.
नेमकं 'त्या' सामन्यात काय घडलं होतं -
पेशावरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सामन्यात पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे हा सामना ३० षटकांचा करण्यात आला. या सामन्यात भारताने प्रथम नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सामन्यात सचिन फलंदाजीला उतरला असता, कादिर गोलंदाजीसाठी आले. सचिन आणि के श्रीकांत यांची जोडी मैदानात होती. तेव्हा स्ट्राईकवर असलेले श्रीकांत यांना कादिर यांनी एकही धाव काढू दिली नाही.
ते षटक संपले त्यानंतर कादिर हे व्यक्तिगत दुसरे षटक घेऊन गोलंदाजीसाठी आले. तेव्हा त्यांनी सचिनच्या जवळ जात सचिनला उद्देशून म्हणाले की, हा एकदिवसीय सामना नसेल तर तु माझ्या पुढच्या षटकात षटकार मारण्याचा प्रयत्न कर. जर तु हे केलेस तर यशस्वी होशील. त्यावेळी सचिनने काही उत्तर दिले नाही. मात्र, पुढच्या षटकात सचिनने कादिर यांना तीन षटकार मारले.
दरम्यान, सचिनने या सामन्यात १८ चेंडूत ५३ धावांची दणकेबाज खेळी केली होती. यात त्याने एकाच षटकात २७ धावा काढल्या होत्या. यामध्ये ४ षटकार आणि १ चौकार मारला होता.
अब्दुल कादिर यांनी इंग्लंडविरुद्ध एका डावात ५६ धावांमध्ये ९ गडी बाद करण्याची किमया केली होती.