कराची - पाकिस्तान क्रिकेट संघाचा नवनियुक्त प्रशिक्षक मिसबाह उल हक याने श्रीलंका दौऱ्यासाठी पाकिस्तान संघाची घोषणा केली. या घोषणेनंतर त्याने पाकिस्तानच्या खेळाडूंसाठी विशेष डाएट प्लॅन सुरु केले आहे.
हेही वाचा - स्कॉटलंडचा पराक्रम, टी-२० मध्ये ठोकल्या २५२ धावा, २०० धावांची सलामी भागीदारी
मिसबाहने आदेश दिल्याप्रमाणे घरच्या मैदानावर खेळणाऱ्या आणि राष्ट्रीय कॅम्पमधील खेळाडूंना पचण्यास जड असणारे डाएट मिळणार नाही. राष्ट्रीय संघात निवड होण्यासाठी खेळाडूंना फिट असणे महत्वाचे आहे, असे मिसबाहने म्हटले आहे.
कायदा-ए-आजम ट्रॉफीच्या सामन्यासाठी एका कॅटरिंग कंपनीला कंत्राट दिले आहे. या कंपनीच्या एका सदस्याने सांगितले,'खेळाडूंसाठी गोडधोड जेवण आणि बिर्याणी बंद करण्यात आली असून सोबत जास्त तेलकट अन्नही बंद करण्यात आले आहे. मिसबाहने खेळाडूंसाठी बार्बेक्यू आणि भरपूर प्रमाणात फळे असलेला पास्ता असा एक डाएट प्लॅन तयार केला आहे. हे डाएट स्पर्धा संपेपर्यत सुरु राहील. '
मिसबाहने वयाच्या ४३ वर्षापर्यंत क्रिकेट खेळले होते. आगामी श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी पाकिस्तानचा संघ घोषित करण्यात आला. मिसबाहने संभाव्य २० सदस्यीय संघात अनुभवी खेळाडूंना संधी दिलेली नाही. अनुभवी शोएब मलिक आणि मोहम्मद हाफिज यांना 'डच्चू' देण्यात आला आहे. पाकिस्तान विरुध्द श्रीलंका संघामध्ये तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेची सुरूवात २७ सप्टेंबरपासून होणार आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी पाकिस्तानचा संघ -
सरफराज अहमद (कर्णधार), बाबर आजम, आबिद अली, अहमद शहजाद, इफ्तिखार अहमद, इमाम वसीम, इमाम-उल-हक, मोहम्मद आमिर, मोहम्मद हसनैन, आसिफ अली, फहीम अशरफ, फखर जमान, हैरिस सोहेल, हसन अली, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिजवान, शादाब खान, उमर अकमल, उस्मान शिनवारी आणि वहाब रियाज.