सिडनी - पंचांच्या निर्णयावर नाराज होणे ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराला भोवले. आयसीसीच्या नियमानुसार टिम पेनवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनीत सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात पंचाच्या निर्णयावर टिम पेनने नाराजी व्यक्त केली होती.
भारताच्या पहिल्या डावात ५६ व्या षटकात ऑस्ट्रेलियाने चेतेश्वर पुजाराविरोधात अपिल केले. पण पंचांनी पुजाराला नाबाद ठरवले. तेव्हा पंचांच्या या निर्णयाविरोधात टिम पेनने डीआरएस मागितला. पण डीआरएसमध्येही पुजाराला नाबाद ठरविण्यात आले. या निर्णयावर टिम पेनने नाराजी जाहीर केली. यावेळी त्याने, अपशब्दही वापरले. टिम पेनच्या या कृतीची गंभीर दखल मॅच रेफ्री डेव्हिड बून यांनी घेतली.
मॅच रेफ्री डेव्हिड बून यांनी आयसीसीच्या खेळाडूंसाठीच्या आचार संहिता नियम क्रमांक २.८ अंतर्गत टिम पेनला दोषी ठरवले आणि पेनच्या मॅच फी मधून १५ टक्के रक्कम कापून घेण्याचा निर्णय घेतला. तसेच पेनच्या बेशिस्त वर्तनासाठी त्याच्या रेकॉर्डमध्ये एक डिमेरिट गुण जोडण्यात आले. दरम्यान, टिम पेनने शिक्षा स्वीकारल्याचे लगेच जाहीर केले. यामुळे टिम पेन विरोधात सुनावणी झाली नाही.
हेही वाचा - IND VS AUS : सामना रंगतदार स्थितीत, रहाणे-पुजारा जोडीवर मदार
हेही वाचा - रविंद्र जडेजाची दुखापत गंभीर, इंग्लंडविरुद्धच्या २ कसोटी सामन्यांना मुकणार