लॉड्स - विश्वकरंडकाच्या इतिहासामध्ये प्रथमच अंतिम सामना इंग्लंड विरुध्द न्यूझीलंड हा बरोबरीत सुटला. त्यानंतर सुपरमध्येही हा सामना बरोबरीत सुटला. तेव्हा अखेर चौकारांच्या निकषानुसार इंग्लंडला विश्वविजेते घोषीत करण्यात आले. या सामन्यात न्यूझीलंडला सुपर ओव्हरपूर्वी सामना जिंकण्याची संधी होती. मात्र, एका ओव्हरथ्रोने न्यूझीलंडच्या विजयावर पाणी फेरले.
सामन्याच्या शेवटच्या ५० व्या षटकात इंग्लंडला विजयासाठी तीन चेंडूत ९ धावांची गरज होती. तेव्हा या षटकाच्या चौथ्या चेंडूवर २ धाव घेण्याचा प्रयत्नात असलेल्या बेन स्टोक्सला बाद करण्यासाठी गुप्टीलने थ्रो केला. तो थ्रो स्टोक्सच्या बॅटला लागून सीमारेषेबाहेर गेला. त्यामुळे पंचानी इंग्लंड एकूण ६ धावा दिल्या. त्यामुळे हा सामना बरोबरीत सुटला.
मात्र, ईएसपीएन या संकेत स्थळाने दिलेल्या माहितीनुसार, ज्या थ्रोवर इंग्लंड संघाने सहा धावा केल्या, तिथे केवळ पाच धावा देणे गरजेचे होते. खेळाच्या नियमानुसार इंग्लंडला एक धाव अधिक मिळाली, असे त्यांनी म्हटले आहे. या निर्णयामुळे सामन्याचे रूप पालटले आणि सामना सुपर ओव्हरमध्ये गेला.
आयसीसीचा नियम काय सांगतो -
आयसीसीने निर्देशित केलेल्या १९.८ च्या नियमात ओव्हर थ्रोची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये जर क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूमुळे चेंडू सीमापार गेला तर त्याचा फायदा दुसऱ्या संघाला होतो. परंतु जर, फलंदाजाने थ्रो करण्याआधी धाव पूर्ण केली नसेल तर, एक अतिरिक्त धाव फलंदाजाला मिळत नाही.
या नियमानुसार पाहिल्यास न्यूझीलंडच्या गुप्टीलने थ्रो केला तेव्हा बेन स्टोक्स क्रिझमध्ये नव्हता. त्यामुळे दोन धावांच्या ऐवजी केवळ एक धाव देणे गरजेचे होते. मात्र, पंचाच्या या चूकीमुळे न्यूझीलंडला विश्वकरंडकाला मुकावे लागले.