लंडन - खांद्याच्या दुखापतीमुळे इंग्लंडचा फलंदाज ओली पोप पुढील चार महिने क्रिकेटपासून दूर राहणार आहे. इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) ही माहिती दिली.
इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात साउथम्प्टन येथे झालेल्या तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी क्षेत्ररक्षणादरम्यान २२ वर्षीय पोपच्या खांद्याला दुखापत झाली. स्टुअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीदरम्यान चौकाराचा चेंडू अडवताना पोप जखमी झाला. दुखापतीनंतर त्याने त्वरित मैदान सोडले. पोपने बुधवारी खांद्याचे एमआरआय स्कॅन केले. त्याला आता शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. पुढील वर्षी इंग्लंडच्या श्रीलंका आणि भारत दौऱ्यापूर्वी पोप संघात सामील होईल, अशी अपेक्षा आहे. पुढच्या काही आठवड्यात पोपच्या खांद्यावर शस्त्रक्रिया होईल.
कोरोनानंतर पहिल्यांदा क्रिकेट खेळायला सुरुवात केलेल्या इंग्लंडने मायदेशात दोन कसोटी मालिका खेळल्या आणि त्या दोनही जिंकल्या. इंग्लंडने पहिल्यांदा वेस्ट इंडीजला २-१ अशा फरकाने पराभूत केले. त्यानंतर नुकत्याच झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत १-० असा विजय मिळवला. आता इंग्लंडचा संघ पाकिस्तानविरुद्ध ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळत आहे.
उभय संघातील टी-२० मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. यात पहिल्यांदा फलंदाजी करताना इंग्लंड संघाने १६.१ षटकात ६ गड्यांच्या मोबदल्यात १३१पर्यंत मजल मारली होती. यादरम्यान, पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पंचांना हा सामना रद्द करावा लागला.