वेलिंग्टन - मार्टिन गुप्टील (९७) आणि कर्णधार केन विल्यमसन (५३) या दोघांच्या वैयक्तिक अर्धशतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंड संघाने दुसऱ्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. न्यूझीलंडने दुसरा सामना ४ धावांनी जिंकत ५ सामन्याच्या मालिकेत २-० ने आघाडी घेतली.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा न्यूझीलंड संघाने मार्टिन गुप्टील (९७), केन विल्यमसन (५३) आणि जिम्मी निशामच्या आक्रमक ४५ धावांच्या जोरावर निर्धारीत २० षटकात ७ बाद २१९ धावांचा डोंगर उभारला. गुप्टीलने ५० चेंडूत ६ चौकार आणि तब्बल ८ षटकारांसह ही खेळी साकारली. त्याचे शतक तीन धावांनी हुकले. तर निशामने १६ चेंडूत १ चौकार आणि ६ षटकारांसह ४५ धावा झोडपल्या.
न्यूझीलंडने विजयासाठी दिलेल्या २२० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या संघाला २१५ धावांपर्यंत मजल मारता आली. मार्कस स्टोयनिसने ३७ चेंडूत ७ चौकार आणि ५ षटकारांसह ७८ धावांची खेळी करत कडवी झुंज दिली. तळातील डेनिल शम्सने १५ चेंडूत ४१ धावा करत स्टोयनिसला चांगली साथ दिली. पण दोघेही शेवटच्या षटकात मोक्याच्या क्षणी बाद झाले. यामुळे ऑस्ट्रेलियाचा निसटता पराभव झाला. मार्टिन गुप्टील सामनावीर ठरला. उभय संघातील तिसरा टी-२० सामना ३ मार्च रोजी खेळला जाणार आहे.
हेही वाचा - भारतीय संघाबाहेर होताच पृथ्वी शॉ याने झळकावलं द्विशतक
हेही वाचा - Ind vs Eng ३rd Test : भारत पहिल्या दिवसाअखेर ३ बाद ९९, रोहितचे नाबाद अर्धशतक