कोलकाता (पश्चिम बंगाल) - बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांना शनिवारी सकाळी जिममध्ये वर्कआउट करताना हृदयविकाराचा सौम्य झटका बसला. त्यानंतर त्यांना तातडीने कोलकातामधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. शनिवारी त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. दरम्यान, आता गांगुली यांच्या प्रकृतीविषयी रुग्णालयातील डॉक्टरांनी महत्वाची अपडेट दिली आहे.
सौरव गांगुली यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांची एक टीम लक्ष ठेऊन आहे. यातील एका डॉक्टरांनी सांगितले की, सौरव यांना बायपास सर्जरीची गरज नाही. पण त्यांची आणखी अँजिओप्लास्टी करण्यात येऊ शकते. कारण त्यांच्या तीनपैकी दोन रक्तवाहिन्यामध्ये ब्लॉकेज आहेत. उद्या (सोमवार) आमची मेडिकल टीम गांगुली यांच्या अँजिओप्लास्टीविषयी निर्णय घेईल.
आज (रविवार) सौरव गांगुली यांची ईसीजी करण्यात आली. यात त्यांचा रिपोर्ट नॉर्मल आला. तसेच रक्तदाब, पल्स रेट आणि ऑक्सिजन लेवलसुद्धा सामान्य आहे.
दरम्यान, गांगुली यांना रुग्णालयात दाखल केल्याचे वृत्त आल्यानंतर, अनेक जण सोशल मीडियावरून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. तसेच सौरव गांगुली यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह क्रिकेट आणि राजकारणातील अनेक दिग्गजांनी प्रार्थना केली आहे.
हेही वाचा - श्रीलंका विमानतळावर इंग्लंडच्या खेळाडूंसह त्यांचे सामनही केले सॅनिटाईज, पाहा व्हिडिओ
हेही वाचा - अजिंक्यचा जन्मच क्रिकेट संघाचे नेतृत्व करण्यासाठी झाला; दिग्गजाने केली प्रशंसा