नवी दिल्ली - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे संपूर्ण देश २१ दिवसांसाठी लॉकडाऊन करण्यात आला आहे. या व्हायरसचा सामना करण्यासाठी अनेक जण विविध मार्गाने मदत करत आहेत. क्रीडाक्षेत्रातील अनेक खेळांडूनी आपले मानधन देऊ केले आहे. तर, काहींनी आपल्या मानधनात कपात करत उर्वरित रक्कम कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी देऊ केली आहे.
असे असले तरी, बीसीसीआयने भारतीय क्रिकेट खेळाडूंचे मानधन कमी करण्याबाबत सध्या कोणतीही चर्चा झाली नसल्याचे म्हटले आहे. मंडळाचे कोषाध्यक्ष अरूण धुमाळ यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली.
ते म्हणाले, 'नाही, आम्ही मानधनाच्या कपातीबाबत काही बोललो नाही. जे काही निर्णय घेतले जातील ते सर्व लोकांचे हित लक्षात घेऊन घेतले जातील. अर्थात कोरोना ही एक मोठी आपत्ती आहे. एकदा परिस्थिती सामान्य झाल्यावर गोष्टींवर चर्चा केली जाईल.'
बीसीसीआयने आयपीएल स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत स्थगित केली आहे, ही स्पर्धा २९ मार्चपासून सूरु होणार होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयपीएलचा तेरावा हंगाम रद्द करण्यात आला आहे. मात्र बीसीसीआयने अद्याप याची घोषणा केलेली नाही.