अबुधाबी - संयुक्त अरब अमिरातीतील अबुधाबीमध्ये सध्या टी-१० लीग स्पर्धा सुरू आहे. या लीगच्या साखळी फेरीतील अकरावा सामना नॉर्दर्न वॉरियर्स विरुद्ध बांगला टायगर्स संघात पार पडला. नॉर्दर्न वॉरियर्सच्या डावखुऱ्या निकोलस पूरनने २६ चेंडूत ८९ धावांची धमाकेदार खेळी केली. पूरनने तब्बल १२ षटकार खेचत सर्वांना थक्क केले.
हेही वाचा - यंदाची आयपीएल ११ एप्रिलपासून?
वेस्ट इंडिज आणि आयपीएलमधील किंग्स इलेव्हन पंजाब संघाचा प्रमुख फलंदाज असलेल्या पूरनमुळे वॉरियर्सला १० षटकात ४ बाद १६२ धावा करता आल्या. प्रत्युत्तरात बांगला टायगर्सचा संघ १० षटकात ३ बाद १३२ धावाच करू शकला.
पूरन 'ऑन फायर' -
निकोलस पूरनने ३४२.३१ च्या स्ट्राईक रेटने फटकेबाजी केली. यादरम्यान त्याने ३ चौकारही लगावले. पूरनच्या एकूण खेळीतील ८४ धावा या चौकार आणि षटकारांच्या मदतीने आल्या आहेत. या खेळीसाठी पूरनला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेत पूरनने एकूण ३ सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने १६२ धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये गतवर्षी पंजाबकडून १४ सामने खेळताना २ अर्धशतकांच्या मदतीने त्याने ३५३ धावा केल्या होत्या.