वेलिंग्टन - दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंड संघाने बांगलादेशवर एक डाव आणि १२ धावांनी दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशाचा पहिला डाव २११ धावांवर आटोपला होता. त्यानंतर मैदानात आलेल्या न्यूझीलंडच्या संघाने रॉस टेलरच्या २०० धावांच्या द्विशतकी आणि हेन्री निकोल्सच्या १०७ धावांच्या शतकी खेळीच्या जोरावर ६ गडी गमावत ४३२ धावांवर आपला डाव घोषित केला. या दोघांशिवाय कर्णधार केन विलियमसननेही ७४ धावांची चांगली खेळी साकारली.
न्यूझीलंडने आपला पहिला डाव घोषित केल्यानंतर आपला दुसरा डाव खेळण्यासाठी आलेल्या बांगलादेश संघाची सुरुवात चांगली झाली नाही. चौथा दिवसाचा खेळ संपला तेव्हा बांगलादेशने ३ गडी गमावत ८० धावा केल्या होत्या.
सामन्याच्या पाचव्या दिवशी न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी धारदार मारा करत बांगलादेशचा डाव अवघ्या २०९ धावांवर गुंडाळला. बांगलादेशच्या दुसऱ्या डावात न्यूझीलंडकच्या नील वेगनरने सर्वाधिक ५ गडी बाद केले. तर ट्रेंट बोल्टने ४ तर मॅट हेन्री १ गडी बाद केला.
पावसामुळे या सामन्यातील पहिले २ दिवस खेळ होऊ शकला नव्हता. ३ सामन्यांच्या या कसोटी मालिकेतील पहिले २ सामने जिंकून न्यूझीलंडने मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडकडून द्विशतकी खेळी करणाऱया रॉस टेलरला सामनावीरचा किताब देण्यात आला. या मालिकेतील दुसरा कसोटी सामना १६ मार्चला क्राइस्टचर्च येथे होणार आहे.