ख्राईस्टचर्च - न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला आजपासून सुरूवात झाली आहे. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या दिवसाअखेर सर्वबाद २९७ धावा केल्या आहेत. न्यूझीलंडच्या गोलंदाजीचा सामना करण्यात पाकिस्तानचे फलंदाज अपयशी ठरले. कायले जेमिसनने ५ गडी बाद करत पाकचे कंबरडे मोडले.
न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. तेव्हा प्रथम फलंदाजीसाठी मैदानात आलेल्या पाकिस्तानची सुरूवात खराब झाली. पाकिस्तानचा सलामीवीर फलंदाज शान मसूद शून्यावर बाद झाला. यानंतर आबिद अली आणि अझहर अली या दोघांनी पाकचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. तेव्हा जेमिसनने अलीला (२५) बाद करत दुसरे यश मिळवून दिले. यानंतर पाकिस्तानची मधली फळी कोसळली. हॅरिस सोहेल आणि फवाद आलम अनुक्रमे १ आणि २ धावांवर बाद झाले.
पाकिस्तानची अवस्था ४ बाद ८३ अशी केविलवाणी झाली. तेव्हा कर्णधार मोहम्मद रिजवान आणि अझहर अलीने पाकचा डाव सावरला. दोघांनी पाचव्या गड्यासाठी ८८ धावांची भागिदारी केली. रिजवान ६१ धावांवर बाद झाला. त्यानंतर अझहर अलीने फहिम अशरफसोबत सहाव्या गड्यासाठी ५६ धावांची भागिदारी रचली. वैयक्तिक ९३ धावांवर अझरह अली बाद झाला. तर अशरफने ४८ धावा केल्या.
कसोटीत पदार्पण केलेला पाकिस्तानचा युवा खेळाडू जफर गौहर याने ३४ धावांची खेळी केली. अखेरीस पाकच्या संघाचा पहिला डाव २९७ धावांवर आटोपला. न्यूझीलंडकडून कायले जेमिसन याने ५ विकेट घेतले. तर टीम साऊथी आणि ट्रेट बोल्ट यांनी प्रत्येकी २-२ गडी बाद करत त्याला चांगली साथ दिली. मॅट हेन्रीने एक गडी टिपला.
हेही वाचा - शेवटच्या कसोटीसाठी टीम इंडियाचा ब्रिस्बेनला जाण्यास नकार?
हेही वाचा - श्रीलंका विमानतळावर इंग्लंडच्या खेळाडूंसह त्यांचे सामनही केले सॅनिटाईज, पाहा व्हिडिओ